"बिल क्‍लिंटन'ने एड्‌सग्रस्तांना आधार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ः एचआयव्हीग्रस्तांच्या रोगप्रतिकार शक्तीचे मोजमाप करणे आणि त्यानंतर एड्‌सग्रस्तांसाठी उपचाराची दिशा ठरविण्याचे सामाजिक कार्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) तेरा वर्षांपासून होत आहे. विदर्भातील एड्‌सग्रस्तांच्या मदतीसाठी बिल क्‍लिटंन फाउंडेशनने 13 वर्षांपूर्वी सीडीफोर यंत्र देऊन आधार दिला. मेडिकलच्या एआरटी सेंटरमधील नोंदीतील पन्नास हजारांवर एचआयव्हीग्रस्तांना औषधोपचारासाठी पात्र ठरवले. त्यांचा सेल काउंट वारंवार मोजला जातो. आता हे यंत्र जीर्ण झाले असून एड्‌सग्रस्त कधीही निराधार होऊ शकतात.
अमेरिकेतील बिल क्‍लिंटन फाउंडेशनने 2006 साली एड्‌सग्रस्तांची रोगप्रतिकार शक्ती मोजणारे 90 लाख रुपये किमतीचे "सीडी-फोर काउंटर' मेडिकलच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाला भेट दिले. हे "सीडी-फोर काउंटर' मेडिकलमध्ये उपचार घेणाऱ्या एड्‌सग्रस्तांसाठी वरदान ठरत आहे. 2006 ते 2010 या कालावधीत 77 हजार आणि 2010 ते 2014 या कालावधीत 63 हजार अशा आठ वर्षांच्या कालावधीत 1 लाख 40 हजार रक्तचाचण्या करण्यात आल्या आहेत. यानंतर 2014 ते 2019 या कालावधीत 61 हजार एड्‌सग्रस्तांची रोगप्रतिकारशक्ती मोजण्यात आली. या एड्‌सग्रस्तांची रोगप्रतिकार शक्ती दर दिवसाला कमी-जास्त होत असते. अशावेळी रुग्णांना योग्य उपचाराची गरज असते. रुग्णांचा सेल काउंट 200 असेल, अशा रुग्णांनाच औषधासाठी पात्र ठरविण्यात येत होते. परंतु, यात सुधारणा करण्यात आली आणि ज्या एड्‌सग्रस्तांचा सीडी-फोर काउंट' 350 आहे, अशा रुग्णांनाही "एन्टी रेट्रोव्हायर ट्रीटमेंट' (एआरटी) वर आणले जात आहे. यामुळे एड्‌सग्रस्त रुग्णांना मोफत दिल्या जाणाऱ्या औषधोपचारामुळे सामान्य जीवन जगण्यास मदत होते.

विविध राज्यांतील लाभार्थी
मेडिकलच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील "सीडी-फोर काउंटर'वर विदर्भातील एड्‌सग्रस्तांच्या चाचण्या होतात. परंतु छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांतील एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या मदतीलाही या यंत्राचा आधार आहे. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात सूक्ष्मजीवशास्त्र विभागाकडून हा प्रकल्प सातत्याने आणि सजगतेने राबवण्यात येत आहे.

नवीन सीडी-फोर काउंटरची गरज
मेडिकलमधील सूक्ष्मजीवशास्त्र विभागात लावण्यात आलेल्या सीडी-फोर काउंटरला 13 वर्षे झाली. या यंत्राची क्षमता लक्षात कमी झाली. नव्हे तर हे यंत्र कालबाह्य झाले. आता नवीन सीडी-फोर काउंटरची गरज आहे. मेडिकलमधील या प्रयोगशाळेला नॅशनल एड्‌स रिसर्च इस्टिट्यूटची (नारी) मान्यता आहे. येथील चाचण्या 100 टक्के तंतोतंत खऱ्या उतरल्याचा अहवाल "नारी'कडून प्राप्त झाला. विशेष असे की, देशात सर्वाधिक अचूक चाचण्या करण्याचा विक्रम नोंदवला. यामुळे मेडिकलमधील "सीडी-फोर काउंटर' प्रयोगशाळेची दखल घेतली आणि राज्य आणि केंद्र शासनाकडून पुरस्कारही प्राप्त झाला आहे.

मेडिकलच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील "सीडी-फोर काउंटर' एड्‌सग्रस्तांसाठी वरदान आहे. या यंत्राला 13 वर्षे झाले असूनही हे यंत्र सुस्थितीत आहे. "सीडी-फोर काउंटर' निकामी होण्यापूर्वी दुसरे यंत्र प्राप्त होईल. यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
- डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com