गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

हिंगणा (जि.नागपूर) ः तालुक्‍यातील एका पतसंस्थेच्या पदाधिका-यांनी ठेवीदारांना विविध आमीषे दाखवून कोटयवधी रूपये गंडावल्याचे उघडकीस आले आहे.सहकारी पतसंस्थेचे उपलेखा परिक्षकाने केलेल्या अंकेक्षणावरून हा घोटाळा उजेडात आला. याप्रकरणी पतसंस्थेविरूद्‌ध हिंगणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगणा (जि.नागपूर) ः तालुक्‍यातील एका पतसंस्थेच्या पदाधिका-यांनी ठेवीदारांना विविध आमीषे दाखवून कोटयवधी रूपये गंडावल्याचे उघडकीस आले आहे.सहकारी पतसंस्थेचे उपलेखा परिक्षकाने केलेल्या अंकेक्षणावरून हा घोटाळा उजेडात आला. याप्रकरणी पतसंस्थेविरूद्‌ध हिंगणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठेवीदारांना विविध आमिषे दाखवून एका पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी गुंतवणूक केल्याचे कागदोपत्री दाखवून ठेवीदारांची 1 कोटी 13 लाख 78 हजार 799 रुपयांनी फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2018 दरम्यान ही फसवणूक करण्यात आली. हिंगणा येथील विदर्भ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष पुष्पा सुनील मोडक, संचालक सुनील डोमाजी मोडक, व्यवस्थापक काशीनाथ किसन चौके, दिगांबर बोरघाटे आणि कर्मचारी प्रणय इटनकर यांनी ठेवीदारांना विविध आमिषे दाखवून त्यांना पतसंस्थेत गुंतवणूक करण्यास बाध्य केले. पतसंस्थेवर विश्‍वास ठेवून शेकडो ठेवीदारांनी आपल्या ठेवी पतसंस्थेकडे ठेवल्या. काही दिवस पतसंस्थेचा कारभार व्यवस्थित सुरू होता. मात्र, 1 एप्रिल 2016 पासून पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अपहार करायला सुरुवात केली. पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी इतर सहकारी संस्थांमध्ये गुंतवणूक केल्याचे कागदोपत्री दाखविले.

मात्र, प्रत्यक्षात ज्या संस्थेत गुंतवणूक केली, ती संस्थाच अस्तित्वात नव्हती. आवश्‍यक नसताना आणि खर्च करण्याचे अधिकार नसतानादेखील पदाधिकाऱ्यांनी अनावश्‍यक खर्च दाखविला. ठेवीदारांच्या ठेवींची मुदत संपल्यानंतर त्यांनी आपले पैसे परत मागितले असता पदाधिकाऱ्यांनी पैसे देण्यास नकार दिला.

या प्रकरणी सहकारी संस्थेचे उपलेखा परीक्षक तेजराम महादेव गाऊत्रे (45, रा. वडधामना) यांनी पतसंस्थेचे अंकेक्षण केले असता हा भोंगळ कारभार उघडकीस आला. अंकेक्षण अहवालात पदाधिकाऱ्यांनी 1 कोटी 13 लाख 78 हजार 799 रुपयांचा अपहार केल्याचे उजेडात आले. या प्रकरणी तेजराम गाऊत्रे यांच्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Billions of dollars to investors