"बायोसीएनजी'मुळे शेतकऱ्यांचाच फायदा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

नागपूर : शेतीतील कचऱ्यापासून बायोसीएनजी निर्मिती काळाची गरज असून, त्याचा वापर वाढल्यास शेतकऱ्यांचाच फायदा होईल. त्यामुळे विदर्भाची आर्थिक स्थिती भक्कम होईलच, शिवाय पर्यावरणही उत्तम राखता येईल, असे केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले.

नागपूर : शेतीतील कचऱ्यापासून बायोसीएनजी निर्मिती काळाची गरज असून, त्याचा वापर वाढल्यास शेतकऱ्यांचाच फायदा होईल. त्यामुळे विदर्भाची आर्थिक स्थिती भक्कम होईलच, शिवाय पर्यावरणही उत्तम राखता येईल, असे केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले.
ऑटोमोटिव्ह चौक परिसरात खासगी कंपनीच्या सीएनजी पंपाचे त्यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर नंदा जिचकार, परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, रॉमॅट कंपनीचे संचालक व्ही. सुब्बाराव प्रामुख्याने उपास्थित होते. गडकरी म्हणाले, रामटेक तालुक्‍यात अरोली येथे लागवड होणाऱ्या "नॅपीअर ग्रास'पासून बायोडायजेस्टद्वारे बायोसीएनजी तयार करण्यात येत आहे. असे सुमारे 150 प्रकल्प विदर्भात सुरू होणार असून, यातून शेतकऱ्यांना प्रतिएकर दोन लाख रुपये उत्पन्न होऊ शकते. या प्रकल्पामुळे सुमारे 1 लाख रोजगाराची क्षमता निर्माण होईल. खासगी कंपनीच्या सीएनजी पंपाचे मुख्य स्थानक असणारे नागपूर देशातील पहिले शहर ठरले. किफायतशीर असलेल्या सीएनजीमुळे शहर प्रदूषणमुक्त होईल, असेही गडकरी म्हणाले. रॉमॅट प्रकल्पाच्या माध्यमातून नागपुरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सुमारे 50 विद्यार्थ्यांना रोजगार मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. पालिकेच्या ताफ्यातील सर्वच डिझेल वाहने तीन महिन्यात 100 टक्के सीएनजीवर रूपांतरीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मनपाची वर्षाला 60 कोटी रुपयांची बचत होईल. मनपाच्या सातपैकी पाच बायोडायजेस्टरमध्ये शहरातील सांडपाणी, कचरा व घनकचरा याद्वारे सुमारे 40 ते 50 टन बायो सीएनजी निर्मिती झाल्यानंतर मनपाच्या बसेस, ट्रक व कार आता बायोसीएनजीवर संचालित होतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. शहरातील खासगी महाविद्यालये, खासगी कंपन्यांच्या बस, ट्रक आदींमध्ये सीएनजीचा वापर करावा. त्यामुळे विदर्भाची आर्थिक स्थिती भक्कम होईल. इथेनॉलवरील बाइकही आता येत असून देशाला त्याचा फायदा होईल, असेही त्यांनी नमूद केले

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bio cng helpful to farmers