अकोला शहरात सहा ठिकाणी उभारणार बायो टॉयलेट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे स्वागत आहे. पब्लिक प्रायवेट पार्टनरशिप मध्ये उभारण्यात येणाऱ्या या बायोटॉयलेटमुळे जनतेला निशुल्क सुविधा पुरविण्यात येतील. आम्ही या उपक्रमाची जबाबदारी घेण्यास तयार आहे. स्वच्छ भारत संकल्पनेला यामुळे राज्यात बळ मिळेल.
- अरविंद देठे, उद्योजक, अकोला.

अकोला ः स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभरात विविध उपक्रम राबविल्या जात आहेत. अकोला शहराने स्वच्छता मोहिमेत देशभरात लौकीक प्राप्त केला. त्याच धर्तीवर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवर आता शहरातील सहा ठिकाणी बायो टॉयलेट लावण्यात येतील. यासाठी आज (ता.३) जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जागांची पाहणी केली असून सहा ठिकाणे निश्चित केली आहेत.

शहरातील वाढती लोकसंख्या आणि विविध कामानिमित्त शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी स्वच्छ, सुंदर टॉयलेट गरजेचे होते. बऱ्याच महिला-पुरुषांच्या याबाबत वारंवार मागणी वाढत होती. महानगरपालिकेने ठिकठिकाणी व्यवस्था केली. मात्र, वाढती लोकसंख्या आणि बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची संख्या बघता ती अपुरी पडत होती. मंगळवार (ता.३) जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्वतः उद्योजक अरविंद देठे यांचे सोबत जागांची पाहणी केली. शहरातील वर्दळीची सहा ठिकाणे निश्चित करुन त्याला मंजुरी दिली. येत्या दोन महिन्यांमध्ये ही सुविधा जनतेसाठी खुली करण्यात येणार आहे.

भारत एक कदम ग्रुपचा प्रयोग
पे अॅन्ड युज तत्वावर ही सुविधा उपलब्ध करण्यात येत असून ती भारत एक कदम ग्रुप तर्फे जनतेकरीता निशुल्क असेल. सरकारचा एक पैसाही न घेता हा प्रयोग राबविण्यात येणार आहे.

वर्दळीची सहा ठिकाणे
१) सर्वोपचार रुग्णालय
२) जिल्हा स्त्रि रुग्णालय
३) जिल्हाधिकारी कार्यालय
४) मध्यवर्ती बसस्थानक
५) अशोक वाटीका चौक
६) सिव्हिल लाईन्स चौक

धाडसी निर्णयाचे कौतुक
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी भर उन्हात स्वतः जागांची पाहणी केली. नागरिकांसाठी सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने त्यांनी उचललेल्या या धाडसी निर्णयाचे कौतुक होत आहे.

जनतेतून सातत्याने स्वच्छ, सुंदर टॉयलेटची मागणी वाढत होती. महानगरपालिकेची तशी सुविधा उपलब्ध आहे. मात्र, वाढती लोकसंख्येमुळे व्यवस्थेवर ताण येत होता. वर्दळीच्या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या या टॉयलेटमुळे जनतेला पुढील दोन महिन्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध येईल.
- आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी, अकोला

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे स्वागत आहे. पब्लिक प्रायवेट पार्टनरशिप मध्ये उभारण्यात येणाऱ्या या बायोटॉयलेटमुळे जनतेला निशुल्क सुविधा पुरविण्यात येतील. आम्ही या उपक्रमाची जबाबदारी घेण्यास तयार आहे. स्वच्छ भारत संकल्पनेला यामुळे राज्यात बळ मिळेल.
- अरविंद देठे, उद्योजक, अकोला.

Web Title: bio toilet in Akola