पशुपक्ष्यांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था करा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

उन्हामुळे जीवाची काहिली होत असताना पाण्यासाठी पशुपक्ष्यांची त्राही होत आहे. त्यामुळे पक्षिप्रेमींनी त्यांच्या संगोपनासाठी पुढाकार घ्यावा. शक्‍यतो घराच्या आसपास मातीच्या पात्रात  पाणी व काही धान्य ठेवावे. बगीच्यात किंवा जेथे अधिक झाडे असतील अशा ठिकाणी टाकाऊ वस्तूपासून निर्मित केलेले जलपात्र टांगून ठेवावे. यात पाणी व धान्य राहील अशी सोय करावी. 
- अविनाश लोंढे, पक्षिप्रेमी

नागपूर - देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या ग्रीनसिटीच्या यादीतून शहर पिछाडल्यानंतर आता शहरीकरणासाठी सर्रास वृक्षांच्या कत्तली झाल्यात. सगळीकडे सिमेंटची जंगले उभी राहिलीत. पक्ष्यांचा हक्काचा निवाराच हरवला. जी काही मोजकी झाडे आहेत, ती तप्त उन्हामुळे निष्पर्ण  झाली आहेत. परिणामी पशुपक्ष्यांना जगण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे.

यामुळे पशुपक्ष्यांसाठी मनुष्यांनी घराच्या छतावर अथवा खिडकीमध्ये पाणी आणि खाण्याची व्यवस्था करावी असे पक्षिप्रेमींकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

नागपुरातील उन्हाळा म्हणजे जीवाची काहिली करणारा. आसपास दाहक वातावरण, निष्पर्ण होत चाललेले वृक्ष, कोरडे पडत चाललेले जलसाठे. या सगळ्यांचा परिणाम संपूर्ण सृष्टीवर जाणवतेय. मग पक्ष्यांची आणि प्राण्यांची कथा ती काय, सिमेंटच्या जंगलात थेंबभर पाण्यासाठी  तगमगणारे पक्षी आणि पाण्याच्या एका घोटासाठी भरकटणारे पशू पाहिले की अंगावर सर्रकन काटा येतो. पशुपक्ष्यांनी पाण्यासाठी दिलेली मूक आर्त हाक मनुष्यांपर्यंत पोहोचणे खरे गरजेचे आहे. 

मानव भौतिक सुखांच्या मागे लागला आहे. जगणे डिजिटल झाले आहे. सिमेंटचे जंगल वेगाने फोफावत आहे. मात्र, यामुळे निसर्गाचे संतुलन वेगाने ढासळतेय. पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने हवामानाचे तंत्रही बिघडले आहे. पशुपक्षी नामशेष होत आहेत. निसर्गाचे संतुलन तोलण्याची मोठी जबाबदारी पार पाडणारे पशुपक्षी जगण्यासाठी धडपडत आहे. निसर्गाचे हे धन खरेच जपायचे असेल तर पशुपक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची सोय समाजातील प्रत्येक घटकाने आवर्जून करावी, असे मत पक्षिप्रेमी अविनाश लोंढे यांनी केली व्यक्त केले आहे.

Web Title: Bird Fodder Water Management City