पक्ष्यांचा किलबिलाट परत यावा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

देवलापार - गो-विज्ञान शाळेतील नैसर्गिक तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, गोबर गॅस प्रकल्प अतिशय चांगले आहे. संपूर्ण भारतात या उपक्रमांची माहिती होणे गरजेचे आहे. गावागावांत लुप्त झालेल्या पक्ष्यांचा किलबिलाट, विविध प्रकारचे पक्षी कसे परत येतील, याबाबत विचार व्हावा, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.

देवलापार - गो-विज्ञान शाळेतील नैसर्गिक तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, गोबर गॅस प्रकल्प अतिशय चांगले आहे. संपूर्ण भारतात या उपक्रमांची माहिती होणे गरजेचे आहे. गावागावांत लुप्त झालेल्या पक्ष्यांचा किलबिलाट, विविध प्रकारचे पक्षी कसे परत येतील, याबाबत विचार व्हावा, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.

येथील गो-विज्ञान अनुसंधान केंद्राला त्यांनी गुरुवारी भेट दिली. या वेळी संशोधकांशी चर्चा करून गोमूत्र आणि शेणापासून अनेक उत्पादनांची माहिती जाणून घेतली. निमटोला गावालगतच्या मैदानावर हेलिकॉप्टर उतरले. अचानक आलेल्या आवाजामुळे ग्रामस्थांनी गर्दी केली होती. नया केंद्राजवळ त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी गोपूजन केले. देवलापार येथे त्यांनी गो-विज्ञान अनुसंधान केंद्राचा परिसर बघितला. सरपंच संजय जयस्वाल यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला. या वेळी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा परिषद सदस्य दुर्गावती सरियाम, पंचायत समिती सदस्य प्रणाली सरोदे, कट्टाच्या सरपंच किरण जयस्वाल, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, उपविभागीय अधिकारी राम जोशी, प्रकल्प अधिकारी शुभांगी सपकाळ, पोलिस अधीक्षक अनंत रोकडे यांची उपस्थिती होती.

या वेळी ते म्हणाले, केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाशी तसेच राज्य शासनाच्या कृषी, आरोग्य आदी विभागांसोबत समन्वय ठेवला तर त्याचा गो विज्ञान फायदा सामान्य नागरिकांना होऊ शकतो. गो-विज्ञान अनुसंधान केंद्राने येथे जास्तीत जास्त गायींच्या प्रजाती आणण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

या वेळी राज्यपालांनी परिसरातील औषध विभाग, गो-शाळा, सेंद्रिय शेती प्रकल्प, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प औषधी वनस्पती शेती आदींची पाहणी केली. केंद्रांचे अध्यक्ष हेमंत जांभेकर यांनी राज्यपालांना स्मृतिचिन्ह भेट दिले. कार्यक्रमाला नीरीचे पूर्व निर्देशक तपन चक्रवती, औषधी विद्या विभागातील नंदिनी भोजराज यांच्यासह इतर विभागाचे शास्त्रज्ञ, शिक्षक, नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते. तत्पूर्वी देवलापार येथील गुरुकुल आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम, बॅंडपथक आणि स्वागत गीताने राज्यपालांचे स्वागत केले. आयोजनाकरिता गो-विज्ञान अनुसंधान केंद्रांचे अध्यक्ष हेमंत जांभेकर, उपाध्यक्ष देवेंद्रजी भरतीया, सचिव सुरेश डवले, केंद्रांचे समन्वयक सुनील मानसिंहका यांनी सहकार्य केले.

Web Title: Birds chirp be back