भाजपला बंडखोरीचे ग्रहण

file photo
file photo

यवतमाळ : विधानसभा निवडणूक मतदानाला जेमतेम आठ दिवसांचा कालावधी उरला असताना केळापूर-आर्णी मतदारसंघात भाजपला बंडखोरीचे लागलेले ग्रहण सुटण्याचे नाव घेताना दिसत नाही. तर, भाजप बंडखोर आणि कॉंग्रेस उमेदवारांतच थेट लढत होणार असल्याचे मतदारसंघातील मागोवा घेतला असता दिसून येते.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आज आर्णी येथे जाहीर सभा झाली. या सभेत पांढरकवडा नगरपालिकेतील प्रहारचे 14 नगरसेवक व बाजार समित्यांच्या तीन संचालकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपला थोडीफार ऊर्जितावस्था प्राप्त होण्याची शक्‍यता असली तरी बच्चू कडू यांच्या 'प्रहार'वर प्रेम करणाऱ्या जनतेने निवडून दिलेल्या पदाधिकाऱ्यांनीच ऐन निवडणुकीत 'विश्‍वासघात' केल्याने या घटनेचे पडसाद याच निवडणुकीतच दिसून येतील, अशीही चर्चा आहे. केळापूर-आर्णी हा मतदारसंघ आदिवासीबहुल असून तो अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघावर कॉंग्रेसची बरीच वर्षे एकहाती सत्ता राहिली आहे. कॉंग्रेसचे माजी मंत्री ऍड. शिवाजीराव मोघे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. गेल्या 2014 च्या मोदी लाटेत या मतदारसंघातून भाजपचे राजू तोडसाम निवडून आले होते. यावेळी ऐनवेळी भाजपने उमेदवार बदलून माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांना उमेदवारी दिली. मात्र, डॉ. धुर्वे यांच्या पाच वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी जनतेची कामे केली असली तरी त्यांना लोकसंग्रह जुळवता आला नाही. त्यामुळे यावेळीही त्यांना लोकनेते अण्णासाहेब पारवेकर यांची 'कुबडी' घेऊन चालावे लागत आहे. तर, विद्यमान आमदार राजू तोडसाम यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांनी बंडखोरी केली असली तरी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात भाजप पक्षाची संघटनात्मक बांधणी केली होती. लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना या मतदारसंघातूनच 60 हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. परंतु, पक्षाने तोडसाम यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले. त्यामुळे भाजपसह मित्रपक्षाचे कार्यकर्ते तोडसाम यांच्या पाठीशी दिसत आहेत. याउलट डॉ. धुर्वे यांना कार्यकर्ते जुळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यांना दुसऱ्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांवरच विसंबून राहावे लागत आहे. या मतदारसंघात जातीय समीकरणे फार तीव्र आहेत. आदिवासीबहुल असलेल्या मतदारसंघात गोंड समाजाचे वर्चस्व आहे. गोंड, परधान, कोलाम व आंध मिळून 90 हजारांवर मतदार आहेत. तर बंजारा व कुणबी समाज मोठ्या संख्येत आहेत. त्यामुळे आदिवासी समाजाच्या मतविभाजनाचा फटका भाजप उमेदवारालाच बसण्याची शक्‍यता आहे. हा मतदारसंघ शहरी व ग्रामीण भागात विभागला गेला आहे. या मतदारसंघात ग्रामीण भागात कॉंग्रेसचे वर्चस्व असून शहरी भागात भाजपचे आहे. मात्र, भाजपच्या बंडखोरामुळे शहरी भागातही भाजपलाच फटका बसण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यात मित्रपक्ष भाजपसोबत युतीत असला तरी त्यांचा सकारात्मक प्रतसाद नसल्याची चर्चा आहे.

मालकांचा उमेदवार नकोच
भाजपने दिलेला उमेदवार स्थानिक लोकनेत्यांच्या आग्रहाखातर देण्यात आल्याची चर्चा आहे. मतदारसंघातील घाटंजी, पांढरकवडा तालुक्‍यात लोकनेत्यांना मानणारा वर्गही मोठा आहे. परंतु, भाजपने आदिवासी गोंड समाजाच्या नेत्यांची उमेदवारी कापून वेळेवर दुसऱ्यालाच उमेदवारी दिल्याने आता मालकांचा उमेदवार नकोच, अशीही चर्चा या मतदारसंघात सुरू आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com