भाजपचे विदर्भातील 38 उमेदवार घोषित; शिवसेनेला फक्त 12 जागा

File photo
File photo

नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेना महायुतीचे जागावाटप अखेर झाले असून विदर्भातल्या 62 पैकी फक्त 12 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. भाजपने आज घोषित केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत विदर्भातील 38 उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत सुधाकर कोहळे (दक्षिण नागपूर) व राजू तोडसाम (आर्णी) या दोन विद्यमान आमदारांना नारळ देण्यात आला आहे. शिवसेनेने तीन उमेदवारांची घोषणा केली आहे.
भाजपनेही मंगळवारी दिल्लीत 125 उमेदवारांची यादी घोषित केली. या यादीत विदर्भातील 38 जागा असून प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मदन येरावार, सुनील देशमुख, अनिल बोंडे, राजकुमार बडोले, डॉ. संजय कुटे यांचा समावेश आहे. 12 जागांचे उमेदवार अजून जाहीर करण्यात आले नसून त्यात कामठीचाही समावेश आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे तेथील विद्यमान आमदार आहे.
शिवसेनेतर्फे मंगळवारी राज्यातील 70 उमेदवारांची घोषणा केली. त्यात मेहकरमधून डॉ. संजय रायमूलकर, बाळापूरमधून नितीन देशमुख व दिग्रसमधून संजय राठोड यांच्या नावाचा समावेश आहे. उर्वरित नऊ उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
युतीच्या जागावाटपात पश्‍चिम विदर्भातील 30पैकी बुलडाणा, सिंदखेडराजा, मेहकर, बाळापूर, रिसोड, बडनेरा, तिवसा, अचलपूर व दिग्रस हे 9 मतदारसंघ; तर, पूर्व विदर्भातील 32 जागांपैकी देवळी, ब्रह्मपुरी व वरोरा हे केवळ तीन मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या चार जिल्ह्यांत शिवसेनेला युतीमध्ये एकही जागा देण्यात आलेली नाही. अकोला, वाशीम व वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.

तोडसाम यांना डच्चू
आर्णी (यवतमाळ) येथील विद्यमान आमदार राजू तोडसाम यांची वादग्रस्त कारकीर्द पाहता त्यांना उमेदवारी मिळणार नाही, याची शक्‍यता अगोदरच वर्तवली जात होती. कंत्राटदारासोबत झालेला वाद व एका महिलेसोबतचे कथित संबंधांचे आरोप तोडसाम यांच्यावर झाले होते. त्यामुळेच त्यांना डच्चू देण्यात आल्याचे कळते. आता तोडसाम बंडखोरी करून मैदानात उतरण्याची तयारी करीत असल्याची चर्चा आहे.

 

भाजपचे घोषित उमेदवार
भाजपने दक्षिण नागपुरातून सुधाकर कोहळे यांच्याऐवजी माजी आमदार मोहन मते व आर्णीतून राजू तोडासाम यांच्याऐवजी डॉ. संजय धुर्ये यांना तिकीट देले आहे
भाजपचे अन्य घोषित उमेदवार व त्यांचे मतदारसंघ असे :-
मलकापूर - चैनसुख संचेती, चिखली- श्‍वेता महाले, खामगाव- आकाश फुंडकर, जळगाव दामोद- डॉ. संजय कुटे, अकोट- प्रकाश भारसाकळे, अकोला पश्‍चिम- गोवर्धन शर्मा, अकोला पूर्व- रणधीर सावरकर, मूर्तिजापूर- हरीश पिंपळे, वाशीम- लखन मलिक, कारंजा- डॉ. राजेंद्र पाटणी, अमरावती- डॉ. सुनील देशमुख, दर्यापूर- रमेश बुंदिले, मोर्शी- डॉ. अनिल बोंडे, आर्वी- दादाराव केचे, हिंगणघाट- समीर कुणावार, वर्धा- डॉ. पंकज भोयर, सावनेर- डॉ. राजीव पोतदार, हिंगणा- समीर मेघे, उमरेड- सुधीर पारवे, नागपूर दक्षिण- मोहन मते, नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे, नागपूर मध्य- विकास कुंभारे, नागपूर पश्‍चिम- सुधाकर देशमुख, नागपूर दक्षिण पश्‍चिम- देवेंद्र फडणवीस, नागपूर उत्तर- डॉ. मिलिंद माने, अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले, तिरोडा- विजय रहांगडाले, आमगाव- संजय पुराम, आरमोरी- कृष्णा गजबे, गडचिरोली- डॉ. देवराव होळी, राजुरा- संजय धोटे, चंद्रपूर- नाना श्‍यामकुळे, बल्लारपूर- सुधीर मुनगंटीवार, चिमूर- कीर्तिकुमार भांगडिया, वणी- संजीव रेड्डी बोदकुरवार, राळेगाव- अशोक उईके, यवतमाळ- मदन येरावार, आर्णी- डॉ. संजय धुर्ये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com