भाजप आश्‍वस्त, कॉंग्रेस आशावादी

file photo
file photo

चंद्रपूर : राज्यात "महाविकास' आघाडीचे सरकार दृष्टिपथात आल्यानंतर आता चंद्रपूर मनपातही हाच प्रयोग यशस्वी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. भाजपच्या तब्बल अकरा नगरसेवकांनी वेगळी वाट निवडली असल्याची माहिती आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. 22) होणारी महापौर आणि उपमहापौरपदाची भाजपला एकतर्फी वाटणारी निवडणूक आता चांगलीच चुरशीची होण्याची शक्‍यता आहे. घोडेबाजार चांगलाच तेजीत आला आहे. नगरसेवकांनाही स्वत:ची "किंमत' यानिमित्ताने कळली आहे. 

महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव

पुढील अडीच वर्षांसाठी महापौरपद महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव निघाले आहे. भाजपतर्फे माजी महापौर राखी कंचर्लावार यांना पुन्हा संधी देण्यात आली. उपमहापौरपदासाठी स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे यांनी नामांकन दाखल केले. कॉंग्रेसच्यावतीने कल्पना लहामगे (महापौर) आणि अशोक नागापुरे (उपमहापौर) पदासाठी रिंगणात राहील, हे निश्‍चित आहे. 

भाजपचे नेते  निश्‍चिंत

स्पष्ट बहुमत असल्याने भाजपचे नेते सुरवातीपासून निश्‍चिंत होते. भाजपकडून महापौर आणि उपमहापौरपदाचे नामांकन दाखल झाले आणि परिस्थिती बदलली. कंचर्लावार आणि पावडे यांच्या नावावरून नगरसेवकांमध्ये धुसफूस सुरू झाली. त्यामुळे दगाफटका होऊ नये, म्हणून भाजपने नगरसेवकांना पेंच अभयारण्यात पर्यटनासाठी पाठविले. मात्र, येथेच वादाची ठिणगी पडली आणि अकरा नगरसेवकांनी आपली वेगळी वाट निवडली. ते कॉंग्रेसच्या संपर्कात आले. त्यानंतर कॉंग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आणि त्यांनी बहुमताच्या आकड्याची जुळवाजुळव करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 

पेंचमधून माघारी

महापौरपदाच्या निवडणुकीच्या अठ्ठेचाळीस तासांपूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. विद्यमान महापौर अंजली घोटेकर आणि राखी कंचर्लावार यांच्यातील वाद विकोपाला गेला. घोटेकर नगरसेवकांना आपल्याविरोधात भडकवित असल्याची तक्रार कंचर्लावार यांनी पक्षनेत्यांकडे केली. त्यानंतर घोटेकर यांना बुधवारला पेंचमधून माघारी चंद्रपूरला बोलविण्यात आले. कॉंग्रेसच्या आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांना आज ताडोबा येथे पाठविण्यात आले. दुपारी भाजपचेही नगरसेवक पेंचमधून ताडोबाच्या दिशेने निघाले. मात्र, त्यातील अकरा नगरसेवकांनी थेट नागपूर गाठले आणि हॉटेल रेडिसेंन्स ब्ल्यू येथे ठाण मांडले. या नगरसेवकांच्या भाजप आणि कॉंग्रेस दोघांशीही वाटाघाटी सुरू होत्या.

कुणाचे पारडे

आमची नेमकी "किंमत' ज्यांना कळले, त्याच्यासोबत जाणार, असे त्यांनी सांगितले. पावडे यांच्या बाजूने मात्र मतदान करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, या अकरापैकी सहा नगरसेवकांचे कॉंग्रेसच्या बाजूने झुकते माप असल्याचे समजते. त्यामुळे तूर्तास कॉंग्रेसच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, प्रत्यक्ष नगरसेवक मतदानासाठी सभागृहात पोहचेपर्यंत आणि पोहचल्यानंतर काय घडामोडी होतात, त्यानंतरच कुणाचे पारडे होते, हे स्पष्ट होईल. 

"सरकार'ला जामीन

बंगाली कॅम्प प्रभागातील अपक्ष नगरसेवक अजय सरकार यांच्यावर काही दिवसांपूर्वी भादंवी 307 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ते फरार होते. मात्र, आज त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यामुळे ते उद्या मतदानाला हजर राहू शकतील. सरकार यांना भाजप-कॉंग्रेस दोन्ही गटांकडून बोलविणे आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांनी निर्णय घेतला नव्हता. 


स्पष्ट बहुमतानंतरही चिंता

मनपातील 66 नगरसेवकांमध्ये भाजपकडे 37 नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत आहे. त्यांना मनसे, सेना आणि एक अपक्ष नगरसेवकांचे आजवर पाठबळ होते. आता मात्र, परिस्थिती बदलली आहे. कॉंग्रेसने आपल्या 13 नगरसेवकांसह, मनसेचे दोन, सेना दोन, बसप सहा आणि अपक्ष तीन असे एकूण 26 नगरसेवकांची मोट बांधली आहे. भाजपचे काही नगरसेवकांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com