भाजप, कॉंग्रेसची 'स्वीकृती' कोणाला?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

मनपा स्वीकृत सदस्यांची निवड 18 तारखेला

मनपा स्वीकृत सदस्यांची निवड 18 तारखेला
नागपूर - महापालिकेत जाण्यास इच्छुक असलेल्यांसाठी खुशखबर आहे. स्वीकृत सदस्यांच्या नियुक्‍तीसाठी महापालिकेने 18 तारखेचा मुहूर्त काढला. एकूण पाच सदस्यांची स्वीकृत म्हणून नियुक्ती करायची असून, संख्याबळानुसार भाजपचे चार आणि कॉंग्रेसचा एक कार्यकर्ता महापालिकेत दाखल होईल. दोन्हीकडील इच्छुकांची भरमसाट संख्या लक्षात घेता कोणाला पक्षाची "स्वीकृती' मिळते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महापालिकेत भाजपचे तब्बल 108 नगरसेवक आहेत. यामुळे भाजपकडे महापालिकेत जाण्यास इच्छुक असलेल्यांची संख्या भरपूर आहे. चार जागांसाठी चाळीस जण दावे करीत असल्याने पक्षाची अडचण झाली आहे. कोणाचीही निवड केली तरी उर्वरित इच्छुक नाराज होणारच.

सुमारे चार हजार कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या उमेदवारीची मागणी केली होती. ते शक्‍य नसल्याने अनेकांची समजूत काढून त्यांना बसविण्यात आले होते. काही बंडखोरांना अखेरच्या क्षणी माघार घ्यायला लावली होती. यापैकी काहींना स्वीकृत सदस्य करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. सुमारे दोन महिन्यांपासून नेमक्‍या कोणाची निवड करायची, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. भाजपच्या बंपर विजयात अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांची मेहनत आहे. त्यांचेही समाधान करावे लागणार आहे. याच कारणामुळे हा विषय भाजपने लांबणीवर टाकला होता. दरम्यानच्या काळात स्वीकृतांची संख्या वाढण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन होता. मात्र, हा विषय मागे पडल्याने 18 मे रोजी स्वीकृत सदस्यांची नावे मागविली जाणार आहेत. दुपारी एक ते तीन इच्छुकांना दावेदारी दाखल करावी लागणार आहे. यानंतर सभागृहात हा विषय ठेवून अधिकृत स्वीकृतांच्या नावाची घोषणा केली जाईल.

कॉंग्रेसमध्ये घमासान
कॉंग्रेसनेसुद्धा निवडणुकीदरम्यान अनेकांना स्वीकृत सदस्यांचे गाजर दाखविले होते. काहींना बंडखोरी मागे घ्यायला लावली होती. तर काहींना उमेदवारी नाकारली होती. दुर्दैवाने महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा सफाया झाला. फक्त 29 सदस्य निवडून आले. या संख्याबळावर कॉंग्रेसला फक्त एकाच कार्यकर्त्याचे समाधान करता येईल. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे पराभूत झाल्याने त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या पक्षात सुरू आहे. पक्षातील वजन लक्षात घेता त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे. मात्र, त्यांचे विरोधकही मोठ्या प्रमाणात असल्याने कॉंग्रेसमध्ये पुन्हा गटबाजी उफाळून येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Web Title: bjp, congress approved corporator