सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

अमरावती : महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका जयश्री डहाके यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपले राजीनामा पत्र पक्षनेते सुनील काळे यांच्याकडे पाठविले आहे. राज्यात भाजपचे सरकार असताना स्वपक्षाच्या नगरसेविकेने राजीनामा देण्याचा प्रकार पक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घेतला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा समाजाचे आंदोलन राज्यभर सुरू आहे. समाजाच्या मागणीच्या समर्थनार्थ तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, अशा मागण्यांकरिता नगरसेविका जयश्री डहाके यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा बुधवारी (ता.एक) दिला. राजीनामा पत्राची एक प्रत प्रसार माध्यमांनाही पाठविली आहे. जयश्री डहाके प्रभाग क्र. 12 रुक्‍मिणीनगर-स्वामी विवेकानंद प्रभागाच्या नगरसेविका आहेत. भाजपकडून त्या निवडून आल्यात. राज्यात याच पक्षाचे सरकार असताना व हा मुद्दा सरकारसाठी कठीण झाला असताना स्वपक्षाच्या नगरसेविकेने पक्षाला आव्हान दिल्याचे मानण्यात येत आहे. स्थानिक नेत्यांना विश्‍वासात न घेता किंवा चर्चा न करता पत्र थेट प्रसार माध्यमांकडे सोशल मीडियातून पाठविल्याने पक्षनेतृत्वाने हा विषय गांभीर्याने घेतला आहे.
सकल मराठा समाज आरक्षणासह इतर मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला असून समाजातील सात तरुणांनी बलिदान देत मागण्यांची गरज व्यक्त केली. त्या मागण्यांच्या समर्थनार्थ आपण नगरसेवक पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. यापूर्वी नगरसेविका पंचफुला चव्हाण यांनी प्रभागात कामे होत नसल्याच्या कारणांवरून राजीनामा दिला होता, मात्र नंतर तो त्यांनी परत घेतला.

Web Title: BJP corporator resigned for the demand of maratha reservation