नागपुरात भाजप नगरसेवकांचा असह"योग'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

नागपूर - खूप गाजावाजा करून नागपुरात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे भाजपने ठरविले होते. परंतु, या मेगा इव्हेंटकडे भाजपच्याच नगरसेवकांनी पाठ दाखविली. शहरातील 108 नगरसेवकांपैकी केवळ 5 नगरसेवकांनी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.

नागपूर - खूप गाजावाजा करून नागपुरात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे भाजपने ठरविले होते. परंतु, या मेगा इव्हेंटकडे भाजपच्याच नगरसेवकांनी पाठ दाखविली. शहरातील 108 नगरसेवकांपैकी केवळ 5 नगरसेवकांनी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.

आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी भाजपने कंबर कसली होती. सध्या "संपर्क फॉर समर्थन' मोहीम सुरू आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचा उपयोग केला जाणार होता. या कार्यक्रमासाठी शहरातील 16 संस्थांनासुद्धा सोबत घेतले होते. यासाठी नागपुरातील यशवंत स्टेडियममध्ये 20 हजार लोकांना एकाच वेळी योगासने करता येईल, अशी व्यवस्था केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील, अशीही जाहिरात करण्यात आली होती. परंतु, केंद्रीय मंत्री गडकरी परदेशात गेल्याने या मेगा इव्हेंटची जबाबदारी स्थानिक नेत्यांवरच आली. महापौर नंदा जिचकार यांनाही विदेशवारीचा "योग' त्याही नागपुरातील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महापौर नंदा जिचकारही उपस्थित राहणार नसल्याने नगरसेवकांचाही उत्साह कमी झाल्याचे आजच्या कार्यक्रमावरून दिसून आले. यशवंत स्टेडियम येथे झालेल्या योगदिनाच्या कार्यक्रमाला दीड-दोन हजार लोक उपस्थित होते. भाजपचे केवळ 5 नगरसेवकांनी हजेरी लावली. नागपूर महापालिकेत भाजपचे 108 नगरसेवक आहेत. या नगरसेवकांनीही असहयोग पुकारल्याने कार्यक्रम आयोजकांची चांगलीच अडचण झाली. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, उपमहापौर दीपराज पार्डीकर, नगरसेवक प्रवीण दटके यांनी प्रामुख्याने योग दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. लोकांची उपस्थिती पाहून उपमहापौर पार्डीकर व माजी महापौर प्रवीण दटके यांनी लवकरच काढता पाय घेतला.

Web Title: BJP corporator yog day