भाजपने दाखवला आमदारांवर भरोसा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

नागपूर : भाजपने दक्षिण नागपूरचा अपवाद वगळता सर्व आमदारांवर पुन्हा एकदा विश्‍वास दर्शवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे आणि डॉ. मिलिंद यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघातून समीर मेघे आणि उमरेडमधून पुन्हा एकदा सुधीर पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

नागपूर : भाजपने दक्षिण नागपूरचा अपवाद वगळता सर्व आमदारांवर पुन्हा एकदा विश्‍वास दर्शवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे आणि डॉ. मिलिंद यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघातून समीर मेघे आणि उमरेडमधून पुन्हा एकदा सुधीर पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा लढणार आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची ही त्यांची तिसरी वेळ राहणार आहे. यापूर्वी ते एकत्रित असताना पश्‍चिम नागपूरमधून लढत होते. पूर्व नागपूरमधून लोकसभेत सर्वाधिक मताधिक्‍य मिळवून देणाऱ्या कृष्णा खोपडे हेच उमेदवार राहणार आहे. यावेळी ते किती मताधिक्‍याने निवडून येतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. खोपडे यांनी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा येथील बालेकिल्ला उद्‌ध्वस्त केला आहे. मागील वर्षी कॉंग्रेसने अभिजित वंजारी यांना उमेदवारी दिली होती. आजारपणामुळे पश्‍चिम नागपूरमध्ये सुधाकर देशमुख यांना विश्रांती दिली जाईल अशी चर्चा होती. त्यामुळे अनेकजण येथून इच्छुक होते. यात महापौर नंदा जिचकार, दयाशंकर तिवारी, जयप्रकाश गुप्ता, भूषण शिंगणे यांचा समावेश होता. मात्र, देशमुखांनी पुन्हा एकदा सर्व इच्छुकांवर मात केली. विकास ठाकरे भाजपात येणार आणि त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी अनेक दिवसांपासून चर्चा होती. मात्र, तीसुद्धा फोल ठरली आहे. 
मध्य नागपूरमध्ये आमदार विकास कुंभारे यांच्याऐवजी प्रवीण दटके यांचे नाव आघाडीवर होते. शहराध्यक्ष या नात्याने त्यांना उमेदवारी दिली जाईल, अशी जोरदार येथे चर्चा होती. मात्र, जातीय समीकरण लक्षात घेऊन भाजपने पुन्हा एकदा हलबा समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे. उत्तर नागपूरमधून अनेक इच्छुक भाजपात होते. माजी उपमहापौर संदीप जाधव, धर्मपाल मेश्राम यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, पक्षाने डॉ. माने यांच्यावर पुन्हा विश्‍वास दाखवला. त्यांची लढत आता पुन्हा एकदा कॉंग्रेसचे नितीन राऊत यांच्याशी होईल. 
समीर मेघे यांना हिंगण्यातून दुसऱ्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत भाजप सोडून गेलेले माजी आमदार व राष्ट्रवादीचे उमेदवार विजय घोडमारे यांच्याशी होईल. सुधीर पारवे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यांचा उमरेड मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp, election