Vidhan Sabha 2019 मतदारसंघ टिकविण्याचे भाजपसमोर आव्हान

कृष्णा लोखंडे
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

अमरावती : गतवेळी लाटेत मिळवलेले जिल्ह्यातील चार मतदारसंघ यंदा टिकविण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्‍टमधील एका मतदारसंघावर जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. दोन मतदारसंघ अपक्षांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी युती व आघाडीची दमछाक होत असली तरी जोश भरपूर आहे.

अमरावती : गतवेळी लाटेत मिळवलेले जिल्ह्यातील चार मतदारसंघ यंदा टिकविण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्‍टमधील एका मतदारसंघावर जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. दोन मतदारसंघ अपक्षांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी युती व आघाडीची दमछाक होत असली तरी जोश भरपूर आहे.
अमरावती जिल्ह्यातील अमरावती, दर्यापूर, मोर्शी व मेळघाट हे चार मतदारसंघ गतवेळच्या भाजप लाटेत भाजपच्या तंबूत दाखल झाली. तिवसा व धामणगावरेल्वे मतदारसंघ मिळवणे मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्‍टचा भाग होता. त्यासाठीच मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा तिवसामधील गुरुकुंजमोझरीतून प्रारंभ झाली. मात्र, भरपूर प्रयत्न करूनही पक्षाला कॉंग्रेसला झुंज देईल, अशा शक्तीचा उमेदवार मात्र मिळाला नाही. अखेर त्यांनी मतदारसंघ शिवसेनेच्या पारड्यात दिला.
परंपरागत लढतीचा इतिहास असलेला धामणगावरेल्वे मतदारसंघ गतवेळी थोड्या मतांच्या फरकाने हातचा गेला. 2005 पासून हा मतदारसंघ कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. यंदा तो मिळवायचा, असे स्वप्न बघत मुख्यमंत्र्यांनी इतर इच्छुकांचे पत्ते कापून पुन्हा त्याच घराण्यातील उमेदवारास लढाईसाठी मैदानात पाठविले. त्याच्या समर्थनार्थ उत्तर प्रदेशातून रसद पुरविण्यात येत असल्याची माहिती आहे.
अचलपूर व बडनेरा अनुक्रमे तीन व दोनवेळा अपक्षांच्या तावडीत अडकला आहे. आघाडी व युतीला प्रयत्न करूनही ते जिंकता आलेले नाहीत. या दोन्ही मतदारसंघात भाजपला उमेदवार निश्‍चित करता आले नाही व 2009 मधील युतीचे सूत्र अमलात आणत हे मतदारसंघ सेनेला सोडून देण्यात आले.
अमरावती, मोर्शी, दर्यापूर व मेळघाटवर सध्या लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. विशेषतः यातील मेळघाटवर अधिक लक्ष आहे. राष्ट्रीय अध्यक्षांची सभा या मतदारसंघात घेण्यामागील भूमिका किमान हेच स्पष्ट करणारी आहे. जिल्ह्याच्या अखेरच्या टोकावर सभा घेण्यात आल्याने राजकीय धुरिणांच्या भुवया उंचावल्या आहेत. गतवेळी लाट असल्याने मेळघाटात नवख्या उमेदवारास विजय मिळाला. या वेळी उमेदवार बदलण्यात आला व त्यांची लढत अनुभवी माजी आमदारांसोबत आहे.
मोर्शी मतदारसंघात 2009 मध्ये अपक्ष निवडून आलेल्या उमेदवाराने 2014 मध्ये कमळ हाती धरून लाटेवर स्वार होत विजय मिळवला. तर कॉंग्रेसी उमेदवाराने अमरावतीत भाजपच्या तंबूत दाखल होत निवडणूक जिंकली. दर्यापूरमध्ये नवख्या उमेदवारास विजय मिळवता आला. आता खरी परीक्षा आहे. यंदा आघाडीने या सर्व मतदारसंघांत आव्हान निर्माण केले आहे. लाटेत मिळवलेले चारही मतदारसंघ पुन्हा टिकविण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.

वर्चस्वाची लढाई कायम
आघाडीत राष्ट्रवादीने एकच मतदारसंघ घेत पाच मतदारसंघ कॉंग्रेसला सोडून दिले. दोन मतदारसंघ मित्रपक्षांना दिले. कॉंग्रेसमध्येही फार काही आलबेल नाही. एकदिलाने कामास लावण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना हस्तक्षेप करावा लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP faces challenge to retaining constituency