मौदा नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

मौदा : मौदा नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या भारती राजकुमार सोमनाथे यांनी कॉंग्रेसच्या रोशनी राजेश निनावे यांच्यावर 128 मतांनी निसटता विजय मिळविला. नगरसेवक पदांच्या 17 पैकी 8 जागांवर भाजप, कॉंग्रेस 5, शिवसेना 2 व अपक्ष दोन जागांवर विजयी झाले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी मौदा नगरपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. नगरध्यक्षपदाच्या उमेदवार भारती सोमनाथे यांना 2 हजार 573 मते मिळाली, तर कॉंग्रेसच्या रोशनी निनावे 2 हजार 445 मते मिळाली. कॉंग्रेसची सत्ता खोडून काढत भाजपने एकहाती विजय मिळविला आहे.

सोमवारी सकाळी 10 वा. मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच भाजपचे उमेदवार आघाडीवर होते. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भारती सोमनाथे यांनीदेखील सुरुवातीला मिळविलेली आघाडी कायम ठेवली. दुपारी 1 वाजता सर्व निकाल हाती आल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, जनसुराज्य पक्ष व भाजपच्या बंडखोरांना मतदारांनी साफ नाकारले.
बंडखोर विजयी
विजयी झालेल्या अपक्ष उमेदवार वैशाली चव्हाण यांना भाजपने उमेदवारी नाकारली होती. "जय जिजाऊ' पॅनेलखाली त्यांनी निवडणूक लढविली होती. त्यांना भाजपच्या बंडखोरांनी पाठिंबा दर्शविला होता. तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी नाकारलेले भीमराव मेश्राम विजयी झाले.
चुरशीच्या लढती
निवडणुकीत चुरशीच्या लढतीत शिवसेनेच्या वैशाली मेहर यांनी भाजपच्या वर्षा मरघडे यांचा केवळ 4 मतांनी पराभव केला. तर भाजपचे देवीदास कुंभलकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शैलेंद्र मदनकर यांच्यापेक्षा पाच मते जादा मिळवित विजय मिळविला. भाजपच्या विमल पोटभरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नंदा श्रावणकर यांचा तर कॉंग्रेसच्या नंदा इवनाते यांनी भाजपच्या अनिता भंडारी यांचा केवळ 11 मतांनी पराभव केला.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मौदाच्या विकासासाठी केलेले प्रयत्न, विकासाचे आश्‍वासन, मतदारांचा विश्‍वास व कार्यकर्त्यांचे सहकार्यामुळे विजय मिळविला आहे. मौदा शहराचा विकास हेच आमचे ध्येय आहे.
- भारती सोमनाथे, विजयी नगराध्यक्ष

मौद्याच्या मतदारांनी भाजपला बहुमत देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखविला आहे. मौदा शहरात विकासकामे केली. अनेक कामे अजून पूर्ण व्हायची आहे. ती कामेही पूर्ण करणार. मतदारांनी भाजपला मते देऊन जे कर्ज दिले आहे, त्या कर्जाची परतफेड करणे माझे कर्तव्य आहे. मौद्याच्या जनतेचे आभार.
- चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री

Web Title: BJP flag on Mouda Nagar Panchayat