भाजप सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले - सुनील तटकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

अकोला - 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवित सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने तीन वर्षांच्या कार्यकाळात देशातील गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले. नोटाबंदीनंतर तर शेतमालाची कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या सरकारला जनतेनेच आता धडा शिकवावा, असे आवाहन केले.

अकोला - 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवित सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने तीन वर्षांच्या कार्यकाळात देशातील गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले. नोटाबंदीनंतर तर शेतमालाची कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या सरकारला जनतेनेच आता धडा शिकवावा, असे आवाहन केले.

शिवसेनेचे नेते तथा माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी मंगळवारी (ता.24) राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षात प्रवेश घेतला. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात तटकरे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री वसंतराव धोत्रे, आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार तुकाराम बिडकर, डॉ. संतोष कोरपे, संग्राम कोते पाटील, शिरीष धोत्रे, प्रदेश प्रवक्‍त्या डॉ. आशा मिरगे, प्रदेश संघटक रामेश्‍वर पवळ, ऋषिकेश पोहरे, श्रीकांत पिसे पाटील, विजय देशमुख, अजय तापडिया, पद्मा अहेरकर, मंदा देशमुख, सचिन वाकोडे, नितीन झापर्डे, शरद तसरे, सुरेखा ठाकरे, चंद्रकांत ठाकरे, संग्राम गावंडे, युवराज गावंडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. तटकरे पुढे म्हणाले, देशात दुसऱ्या हरितक्रांतीनंतर शरद पवार यांनी शेतकऱ्यांना उभे करण्याचे काम केले. सर्वसमावेशक धोरण राबवित त्यांनी समाजाच्या उत्थानाचा विचार पेरला. मात्र, सध्या देशात आणि राज्यात जातिवाद पेरून दुफळी माजविण्याचे काम केले जात आहे. जनतेने जागरूक राहून आगामी निवडणुकांमध्ये देशहिताचा, विकासाचा विचार, सर्वसामान्यांना सोबत घेऊन काम करण्याची तयारी असलेल्यांना निवडून देण्याचे आवाहन तटकरे यांनी केले.

सन्मानजनक जागा मिळाल्यास आघाडी -
राज्यात महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी निवडणुका होत आहेत. यामध्ये कॉंग्रेस व समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे. मात्र, सन्मानजनक जागा मिळायला हव्या. ज्याची जेवढी ताकद तशा जागावाटप झाल्यास पक्ष नेतृत्व आघाडीसाठी पुढाकार घेईल. आम्ही आघाडी करण्याची तयारी दर्शवितो म्हणजे स्वबळावर लढू शकत नाही, शक्ती नाही असे कुणी समजू नये, असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षपणे कॉंग्रेसला लगावला.

गावंडेंना प्रदेश उपाध्यक्षपद -
विदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसने 2004 च्या विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवले होते. त्यानंतर तेवढे यश मिळाले नाही. मात्र, आता जनतेचा ओढा वाढत असून 2019 मध्ये चांगले यश मिळवू अशी अपेक्षा व्यक्त करीत तटकरे यांनी गुलाबराव गावंडे यांना पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षपद देत असल्याचे जाहीर केले.

शेतकरीविरोधी पक्ष सोडला - गावंडे
शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणारे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी सेना सोडण्यामागील कारण स्पष्ट करताना शेतकरीविरोधी धोरण राबविणारा पक्ष सोडल्याचे सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील विश्‍वासाने 36 वर्षे शिवसेना घडविण्याचे काम केले. आता उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व आले. त्यांच्या अवतीभोवती हुजऱ्यांची फौज असल्याचा आरोपही गावंडे यांनी केला. शरद पवार यांनी क्रीडांगणापासून माझ्यावर प्रेम केले. आजही त्यांचे प्रेम कायम आहे. शेतकऱ्यांसाठी काम करणारा पक्ष आणि शेतकऱ्यांचे भले करू शकणारा नेता म्हणून पवारांवरील विश्‍वासाने राष्ट्रवादीची निवड केल्याचे गावंडे म्हणाले.

Web Title: BJP government has scattered farmers planted