भाजपचा अंतर्गत कलह उघड; राजकीय सूड उगवल्याची चर्चा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

लाच घेताना लचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकलले वाडी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे यांना सहा वर्षांसाठी अपात्र करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांची यापूर्वीच नगराध्यक्षपवरून हकालपट्टी करण्यात आली होती. 

वाडी -  लाच घेताना लचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकलले वाडी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे यांना सहा वर्षांसाठी अपात्र करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांची यापूर्वीच नगराध्यक्षपवरून हकालपट्टी करण्यात आली होती. 

सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठक उपरोक्त निर्णय घेण्यात आला. प्रेम झाडे यांना पदावरून बरखास्त करण्यात आल्याच्या माहितीला वाडीचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी दुजोरा दिला. नगराध्यक्ष असताना त्यांच्या निवासस्थानी एका कंत्राटदाराने विकासकामाच्या मंजुरीसाठी पैसे दिल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली होती. यावेळी त्यांनी सहकारी नगरसेवक व स्थानिक आमदारांने षडयंत्र रचल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी लाचलुचपत विभागाचा अहवाल मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करून त्यांचा अहवाल राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाला पाठविला. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयात या घटनेची उलटतपासणी सुरू झाली, कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आले. या घटनेची अंतिम सुनावणीसुद्धा संपन्न झाली. या सुनावणीत नगरविकास मंत्रालयाने प्रेम झाडे यांना दोषी ठरविले. त्यांना नगराध्यक्ष पदावरून हटविण्याचे आदेश सोमवारी 19 ऑगस्टला निर्गमित केले आहेत. यासोबतच महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियमानुसार पुढील सहा वर्षांपर्यंत कोणत्याही प्रकारची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढण्यास अपात्र घोषित केले आहे. 

वाडी नगर परिषदेत खळबळ 
नगरविकास खात्याने निर्णयावर तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठविण्यात आले असून ते वाडी नगर परिषदेला रवाना करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ही वार्ता वाडी नगर परिषदेत पोहचताच अधिकारी व कर्मचाऱ्यांत एकच खळबळ उडाली. मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी आदेशाचे पालन करीत कार्यवाही आरंभ करण्याची माहिती दिली. 

वाडी भाजपमध्ये दोन गट 
प्रेम झाडे यांना बरखास्त केल्याने भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे हे विशेष. वाडी नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षाच्या कार्यकाळावरून प्रेम झाडे यांचा त्याचे सहकारी नगरसेवकांसोबत वाद सुरू होता. दरम्यान, त्यांना भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीतूनही काढून टाकण्यात आले होते. यामुळे वाडीमध्ये भाजप दोन गटात विभागला गेला असल्याचे चित्र निर्माण झाले असून त्याचा परिणाम वाडी विकासावर दिसून येत आहे. 

अद्याप आदेश प्राप्त झाला नाही. मी तीन दिवसांपासून बाहेरगावी आहे. मला या आदेशाची कल्पना नाही. त्यामुळे आदेश प्राप्त झाल्यावरच प्रतिक्रिया देणे योग्य ठरेल. 
- प्रेम झाडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP internal dispute in wadi