Vidhan Sabha 2019 भविष्याच्या काळजीपोटी भाजप नेते प्रचारात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

अमरावती : भाजपने या निवडणुकीत मंत्री तसेच वरिष्ठ नेत्यांचे तिकीट ऐनवेळी कापल्याने जिल्ह्यातील अनेक नेत्यांना चांगलाच धक्का बसला. भविष्यात आपलीही स्थिती अशीच होण्याचा धोका लक्षात घेता ते प्रचाराच्या कामाला लागले आहेत.

अमरावती : भाजपने या निवडणुकीत मंत्री तसेच वरिष्ठ नेत्यांचे तिकीट ऐनवेळी कापल्याने जिल्ह्यातील अनेक नेत्यांना चांगलाच धक्का बसला. भविष्यात आपलीही स्थिती अशीच होण्याचा धोका लक्षात घेता ते प्रचाराच्या कामाला लागले आहेत.
विशेष म्हणजे, जिल्ह्यातील तीन मतदारसंघ युतीत शिवसेनेकडे गेले असून पाच मतदारसंघ भाजपकडे आहेत. युतीत उमेदवार कुणीही असला तरी त्याला निवडून आणण्याचा चंग महायुतीच्या नेत्यांनी बांधला आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारातसुद्धा भाजपचे नेते तसेच पदाधिकारी दिसत आहेत. भाजपच्या दिल्ली नेतृत्वाने दिलेला धक्का मोठा असल्याची चर्चा मतदारसंघात आहे. भाजपचे अनेक नेते व पदाधिकारी या वेळी विविध मतदारसंघांत इच्छुक होते. पक्षनेतृत्वाने हिरवी झेंडी दाखविली नसतानाही त्यांनी मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली होती. युतीचा त्यावेळी पत्ता नसल्याने आपण रिंगणात राहूच, असा विश्‍वास या नेत्यांना होता, परंतु युतीची घोषणा झाली व त्यानंतर आपले मतदारसंघसुद्धा गेल्याने इच्छुकांमध्ये निराशा पसरली होती. त्यामुळे त्यांनी प्रचारातून स्वतःला दूर ठेवले होते. मात्र, दरम्यानच्या काळात बड्या नेत्यांचे तिकीट कापले गेल्याने आपण अलिप्त राहिलो तर त्याचे परिणाम भविष्यात भोगावे लागतील, हा विचार करून भाजपचे नेते परत एकदा सक्रिय झाले आहेत. राज्याच्या बड्या नेत्यांची ही अवस्था होऊ शकते तर आपले काय? असा विचारसुद्धा त्यांना अस्वस्थ करीत आहे. त्यामुळे विविध उमेदवारांच्या प्रचारात त्यांनी स्वतःला झोकून दिले असून आपसांतील हेवेदावे विसरून ते कामाला लागले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leaders campaign in full swing