का हाणली आमदारांनी होमगार्डच्या कानशिलात?...वाचा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

कर्तव्यावर असलेला होमगार्ड खाकी पॅन्ट व वर पांढऱ्या रंगाचे शर्ट घालून असल्याने आमदारांनी त्याला गणवेशात का नाही, असा प्रश्‍न केला व कानशिलात हाणली, अशी चर्चा आहे.

वणी (जि. यवतमाळ) : कर्तव्यावर असलेल्या होमगार्डने दुचाकी चालान केल्याच्या कारणावरून वणी येथील भाजपा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी येथील टिळक चौकात होमगार्डच्या कानशिलात लगावल्याची परिसरात चर्चा आहे. होमगार्डच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी आमदार बोदकुरवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी जिल्हा वाहतूक विभागाची उपशाखा सुरू करण्यात आली आहे. या विभागात पोलिस कर्मचारी कमी असल्याने त्यांच्या मदतीसाठी 20 होमगार्ड देण्यात आले आहेत. मंगळवार, 3 डिसेंबर रोजी होमगार्ड प्रकाश बोढे टिळक चौकात वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक व्यवस्था सुरळीत करीत असताना एमएच 29 एक्‍यू 78 53 दुचाकीने ट्रिपल सीट जाणाऱ्या युवकाला थांबवले व चालान फाडावी लागेल, असे सांगितले असता त्यातील एकाने याबाबत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना माहिती दिली. आमदार बोदकुरवार आपल्या वाहनाने टिळक चौकात आले. 

हेही वाचा :  कारागृहात 126 होमगार्ड होणार तैनात 

कर्तव्यावर असलेला होमगार्ड खाकी पॅन्ट व वर पांढऱ्या रंगाचे शर्ट घालून असल्याने आमदारांनी त्याला गणवेशात का नाही, असा प्रश्‍न केला व कानशिलात हाणली, अशी चर्चा आहे. होमगार्डने वाहतूक विभाग गाठला व घडलेली हकिकत सांगितली. मात्र, काही वेळाने मला मारले नसल्याचा पवित्रा होमगार्डने घेतला व शासकीय काम करीत असताना आमदार बोदकुरवार यांनी माझ्या कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार वणी पोलिसांत दिल्याने आमदारांविरुद्ध पोलिसांनी कलम 186 अन्वये गुन्हा 
नोंदविला. 

टी पॉइंटवर केला होता चक्काजाम 

वाहतूक पोलिस गावाबाहेर उभे राहून शहरात येणारी गोरगरीब जनता व शेतकऱ्यांना अडवून विविध नियम लावून वाहनधारकांकडून वसुली केली जात असल्याने आमदार बोंदकुरवार यांनी काही दिवसांपूर्वी वरोरा मार्गावरील टी पॉइंटवर रास्ता रोको केला होता. 

मारहाण केली नाही 
शहरात आमदारांनी होमगार्डला मारहाण केल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच आमदार बोदकुरवार यांनी मी मारहाण केली नसल्याचे सांगितले. सदर होमगार्ड कर्तव्यावर असताना गणवेशात नव्हता. त्यामुळे मी त्याचा हात धरून गणवेशात का नाही, अशी विचारणा केली. त्यामुळे मारहाण करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. 
आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLA Bodkurwar Beating Homeguard