मध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार

राजकुमार भीतकर
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

बुथप्रमुखांना मार्गदर्शन
निवडणूक प्रचाराची रणनीती ठरविली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी (ता. 18) छिंदवाडा येथे सभा असून चांद येथे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांची गुरुवारी (ता. 15) सभा होत आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत कार्यकर्त्यांना कसे पोहोचता येईल, याबाबत आज बुथप्रमुखांना मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी दिली.

यवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर राज्य मिझोरममध्ये प्रचाराला सुरुवात झाली आहे. ही निवडणूक 2019 च्या लोकसभेची नांदी असल्याने त्यासाठी केंद्रातील भारतीय जनता पक्षाने सर्वशक्ती एकवटली आहे. देशभरातील कार्यकर्ते व पदाधिकारी प्रचारासाठी बोलावले आहेत. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील वणी व राळेगावच्या आमदारांचाही सहभाग आहे.

मध्य प्रदेशात एकूण 230 जागांवर निवडणूक होत आहे. 28 नोव्हेंबरला येथे मतदान होणार आहे. 11 डिसेंबरला निकाल जाहीर होतील. मध्यप्रदेशात गेल्या तीन टर्मपासून भाजपची सत्ता असून शिवराज सिंह मुख्यमंत्री आहेत. भाजप व काँग्रेसमध्ये राजकीय युद्धाची स्थिती दिसत आहे. सत्तेत येण्यासाठी दोन्ही पक्ष झुंज देत आहेत. भाजपने त्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. मध्यप्रदेश भाजपने निवडणुकी यवतमाळ जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व आमदारांना पाचारण केले आहे. वणी विधानसभेचे आमदार संजय रेड्डी बोदकुरवार व राळेगावचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके आज सकाळी मध्यप्रदेशात पोहोचले असून त्यांनी निवडणूक प्रचारात सहभाग नोंदविला आहे. डॉ. उईके यांना छिंदवाडा जिल्ह्यातील अमरवाडा विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात 288 मतदान केंद्र व अडीच लाख मतदारांची संख्या आहे. प्रेमनारायण ठाकूर या ठिकाणाहून निवडणूक लढत आहेत. तर, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांना चवराई विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी बुधवारी (ता. 14) मतदारसंघात प्रचार फेरीत सहभाग घेतला. भारतीय जनता पक्षाची बाजू भक्कम असल्याची माहिती त्यांनी दिली.

’जिल्ह्यातील सर्वच आमदारांना मध्यप्रदेश निवडणुकीसाठी बोलावले आहे. त्यातील दोन आमदार बुधवारी गेले असून इतर आमदार 19 नोव्हेंबरपर्यंत जातील. त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी पक्षाने दिली आहे.’
- राजेंद्र डांगे, जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष.

बुथप्रमुखांना मार्गदर्शन
निवडणूक प्रचाराची रणनीती ठरविली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी (ता. 18) छिंदवाडा येथे सभा असून चांद येथे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांची गुरुवारी (ता. 15) सभा होत आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत कार्यकर्त्यांना कसे पोहोचता येईल, याबाबत आज बुथप्रमुखांना मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी दिली.

Web Title: BJP mla participate campaigning in Madhya Pradesh