भाजपमध्येच ‘बेकी’ अन् म्हणे ठाकरे सरकारमध्ये नाही ‘एकी’; भाजपमधील अंतर्गत वादाचे पुन्हा...

राजदत्त पाठक
Thursday, 21 May 2020

राज्यात मार्च महिन्यात कोरोना विषाणूने प्रवेश केला. या महामारीने काही कालावधीच हातपाय पसरण्यास सुरूवात केली. त्यामुळे संपूर्ण देशासह राज्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्यकर्त्यांनी घेतला. प्रत्येकाला आहे त्याच ठिकाणी राहण्याचे आवाहन शासनाने केले.

वाशीम : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्यशासन अपयशी ठरले. सरकारमध्ये असलेल्या तीनही पक्षाच्या नेत्यांमध्ये समन्वय नाही. त्यामुळे राज्यातील जनता संकटात आहे, असा आरोप करीत भाजपने राज्य पातळीवर निवेदनाचे आंदोलन पुकारले आहे. सत्ता असताना ‘बेकी’च्या पातळीवर जिल्ह्यातील भाजपची असलेली परिस्थिती सत्तेबाहेरच्या पहिल्या आंदोलनात ‘एकी’त परावर्तीत होईल, अशी आशा होती. 

मात्र, भाजपमधील अंतर्गत वादाचे पुन्हा जाहीर प्रदर्शन झाले असून आमदार लखन मलिक व भाजप जिल्हाध्यक्ष तथा कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी दोन वेगवेगळी निवेदने दिली आहेत. या दोनही निवेदनात कोरोनाच्या मुकाबल्यासाठी राज्यशासनाच्या तीन पक्षात समन्वय नसल्याचा आरोप केला असला तरी मजेशीर बाब म्हणजे एका पक्षातच दोन नेत्यांची तोंडे दोन दिशेला असल्याने आधी स्वपक्षात एकी करा; असे खोचक टोले समाजमाध्यमांमधून उमटत आहेत.

महत्त्वाची बातमी - कोरोना इफेक्ट : अनेकांची भंगली विदेशवारी, कारण ही सेवा करण्यात आली बंद 

शासनाचा निषेध करणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी दोन वेगवेगळे निवेदने जिल्हा प्रशासनाला दिली. त्यामुळे भाजपमध्येच ‘बेकी’ अन् म्हणे राज्यकर्त्यांमध्ये नाही ‘एकी’ याचा प्रत्यय जिल्ह्यातील जनतेला आला. राज्य शासनाच्या नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव दर्शविणार्‍या भाजपच्या दोन नेत्यांमध्ये तरी एक सूर आहे. का? असा प्रश्‍न जनतेला पडला. संकट काळातील या राजकीय कुरघोडीमुळे भाजपला गटबाजीचा प्रादुर्भाव झाल्याचे चित्र आहे.

आवश्यक वाचा - COVID19 : मुंबई रिटर्नने वाढवली चिंता; या तालुक्यातही कोरोनाची एन्ट्री, गाव सिल

राज्यात मार्च महिन्यात कोरोना विषाणूने प्रवेश केला. या महामारीने काही कालावधीच हातपाय पसरण्यास सुरूवात केली. त्यामुळे संपूर्ण देशासह राज्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्यकर्त्यांनी घेतला. प्रत्येकाला आहे त्याच ठिकाणी राहण्याचे आवाहन शासनाने केले. परिणामी सर्व व्यवहार ठप्प झाले. दरम्यान यावेळी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा व शहर कार्यकारिणीचा कार्यकाळ संपला. यामध्ये पुन्हा भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार राजेंद्र पाटणी यांची नियुक्ती झाली. पक्षाच्या शिरस्त्याप्रमाणे आमदार पाटणी यांनी जिल्हा व शहर कार्यकारिणीत काही पदाधिकाऱ्यांची फेरबदली केली. 

 

आणि याच ठिकाणी गटबाजीची ठिणगी पडल्याची चर्चा सुरू झाली. स्थानिक आमदारांसह कोणत्याही पदाधिकार्‍याला विश्वासात न घेता पदाधिकाऱ्यांची निवड केल्याचा आरोप कार्यकर्ते करू लागले. कोरोना काळात पक्षाच्या आवाहनावर सेवाकार्य करण्यात गुंतलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी या नियुक्त्यांमुळे नाराज होऊन हात आखडता घेतला. असा प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येऊ लागला. दरम्यान भाजपने ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ प्रत्येक जिल्हास्तरावर करण्याचे आदेश जिल्ह्यात धडकले. तेव्हा पक्षात गटबाजी असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले. 

 

कोरोना महामारीला रोखण्यात राज्यशासन अपयशी ठरले आहे. राज्यात असलेल्या तीनही पक्षात समन्वय नसल्याने संपूर्ण राज्यातील जनता संकटात सापडली आहे. अशा आशयाचे निवेदन देऊन शासनाचा निषेध भाजपर्फे करण्यात आला. मात्र, हे निवेदन देत असताना एक निवेदन मंगळवारी (ता. 19) रोजी भाजप जिल्हाध्यक्ष तथा कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात तर दुसरे निवेदन बुधवारी (ता.20) वाशीमचे आमदार लखन मलिक यांच्या पुढाकारात देण्यात आले. त्यामुळे एकाच पक्षाचे दोन निवेदने पाहून जिल्हा प्रशासनातील अधिकारीही चाट पडले. जिल्ह्यातील हे राजकीय डावपेच पाहून ‘भाजपमध्येच ‘बेकी’ अन् म्हणे राज्यकर्त्यांमध्ये नाही ‘एकी’ अशी म्हणण्याची वेळ वाशीम जिल्ह्यातील जनतेवर आली आहे.

राजकीय कुरघोडीत जनता वाऱ्यावर
कोरोना महामारीमुळे जिल्ह्यात सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. समाजातील विविध घटकातील नागरिकांची भीती दूर करण्याची मोठी जबाबदारी विरोधी पक्षातील नेत्यांची आहे. मात्र, येथील नेते राजकीय कुरघोडी करण्यातच धन्यता मानीत असल्याचा आरोप जनतेमधून होत आहे. कोरोना महामारीच्या या संकटात राज्यकर्ते व विरोधीपक्षनेते यांनी आपसी राजकारण दूर ठेवून जनतेला दिलासा मिळेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे, अशी अपेक्षा जनतेमधून व्यक्त होत आहे.

बेरोजगारीचा प्रश्‍न ऐरणीवर...
शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार झालेले लघू उद्योजक यांच्या समस्या जिल्ह्यात सध्या चिंताजनक आहेत. त्यावर तत्काळ तोडगा काढण्याची गरज आहे. काम नसल्याने तसेच उद्योग ठप्प झाल्याने गरिबांना दररोज भेडसावणारी जेवणाची चिंता भीती निर्माण करणारी आहे. अशा वेळी विरोधी पक्षात असणाऱ्या नेत्यांवर मोठी जबाबदारी आहे, असे मत राजकीय अभ्यासक व्यक्त करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLAs have two different statements to washim district administration