भाजपच्या अ. जा. मोर्चाची राष्ट्रीय परिषद उद्यापासून
अमित शहा येणार?
परिषदेच्या समारोपाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या समारोपानंतर २० जानेवारीला दुपारी ३ वाजता विजयी संकल्प सभा कस्तुरचंद पार्कवर होणार आहे.
नागपूर - भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती आघाडीच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या १९ जानेवारीला दुपारी १२ वाजता होणार आहे. या परिषदेला देशभरातील ४ हजारांवर प्रतिनिधी हजेरी लावणार आहेत.
दोन दिवस चालणारी ही राष्ट्रीय परिषद डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात होणार असून उद्घाटन समारंभाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष खासदार विनोद सोनकर, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या परिषदेला भाजपचे अनुसूचित जाती-जमातींचे ४६ खासदार तसेच दीडशेवर आमदार हजर राहणार आहेत. या दोन दिवसांत होणाऱ्या विविध चर्चासत्रांमध्ये अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. यात देशभरातून यासाठी ४ हजारांवर प्रतिनिधी हजेरी लावणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष व आमदार सुधाकर कोहळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय परिषद यशस्वी करण्यासाठी भाजपने २१ समित्या नियुक्त केल्या आहेत. राष्ट्रीय परिषदेच्या स्थळाला छत्रपती शाहू महाराज समता परिसर असे नाव देण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला माजी महापौर प्रवीण दटके, भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष व नगरसेवक धर्मपाल मेश्राम, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अशोक मेंढे, सुभाष पारधी आदी उपस्थित होते.
अमित शहा येणार?
परिषदेच्या समारोपाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या समारोपानंतर २० जानेवारीला दुपारी ३ वाजता विजयी संकल्प सभा कस्तुरचंद पार्कवर होणार आहे. जाहीर सभेत प्रमुख वक्ते शहा आहेत. शहा यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. परंतु त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप या जाहीर सभेला उपस्थित राहू शकणार नाही, असे अधिकृतपणे कळविलेले नसल्याचे आमदार कोहळे यांनी सांगितले. ते आले नाही तरी विजयी संकल्प सभा होणार असल्याचे आमदार कोहळे यांनी स्पष्ट केले.