भाजपकडून नव्या चेहऱ्याची चाचपणी !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जून 2019

गडचांदूर : लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला राजुरा विधानसभा मतदार संघात मिळालेल्या मताधिक्‍याच्या पार्श्‍वभूमीवर विधानसभा निवडणुकीसाठी भाजप नव्या चेहऱ्याची चाचपणी करीत असल्याची चर्चा आहे.

गडचांदूर : लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला राजुरा विधानसभा मतदार संघात मिळालेल्या मताधिक्‍याच्या पार्श्‍वभूमीवर विधानसभा निवडणुकीसाठी भाजप नव्या चेहऱ्याची चाचपणी करीत असल्याची चर्चा आहे.
सन 2014 च्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत दोन हजार मतांने भाजपचे ऍड. संजय धोटे निवडून आले होते. या क्षेत्रातील भाजपचे ते पहिलेच आमदार. या मतदार संघात सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 36 हजार मतांनी भाजप मागे होता. याचे खापर विद्यमान आमदारांच्या डोक्‍यावर फोडण्याची तयारी भाजपमधील एका गटाने सुरू केली आहे. त्यामुळे आता जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे समर्थक आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्याही नावाची चर्चा कार्यक़र्त्यांमध्ये सुरू आहे. धोटे यांच्याऐवजी भोंगळे यांना ुउमेदवारी दिली जाऊ शकते, असा दावा ते करीत आहे. दुसरीकडे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे निकटवर्तीय खुशाल बोंडेही आमदार होण्यासाठी उत्सुक आहे. परंतु धोटे यांनाच उमदेवारी मिळेल. ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहे, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. मात्र कॉंग्रेसला मिळालेले मताधिक्‍य लक्षात घेता कोणतीही जोखीम पत्करण्याच्या तयारीत भाजप नाही. त्यामुळे येथे नवा चेहऱ्याची चाचपणी त्यांच्याकडून होत आहे. वसतिगृहातील अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कॉंग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहे. त्यांना जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.
मात्र कॉंग्रेसची उमेदवारी त्यांनाच मिळेल, असे सांगितले जात आहे. आमदार विजय वडेट्टीवार यांनीही एका कार्यक्रमात याबाबत धोटे यांना आश्‍वस्त केले. मात्र यावेळी या मतदार संघात कॉंग्रेस-भाजप विजयाचा दावा छातीठोकपणे करू शकणार नाही. मागील दोन निवडणुकीत थेट लढत होती. मात्र यावेळी माजी आमदार वामनराव चटप रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे येथे तिरंगी लढत अपेक्षित आहे.
इन्फो
निमकरांचा वेगळा पर्याय
कॉंग्रेस-राष्ट्रवादीची विधानसभा निवडणुकीत आघाडी होईल, अशी तूर्तास शक्‍यता आहे. राष्ट्रवादीचे सुदर्शन निमकर यांनीही विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीत ते विशेष सक्रिय होते. मात्र युतीत जागा कॉंग्रेसच्या वाट्याला आली तर निमकरांना वेगळ्या पर्यायाचा विचार करावा लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP new face