esakal | शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर पालकमंत्री गंभीर नाहीत.. भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा गंभीर आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

amravati

सोयाबीनवर खोडा किड्याचा प्रादुर्भाव झालेला असून शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांची ही परिस्थिती सांगण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेले भाजपचे पदाधिकारी काही सेकंदांतच बाहेर पडले. पालकमंत्र्यांनी कुठलीही चर्चा केली नाही, तसेच या विषयावर गांभीर्यसुद्धा दाखविले नाही, असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर पालकमंत्री गंभीर नाहीत.. भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा गंभीर आरोप

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : सोयाबीनवर खोडा किड्याचा प्रादुर्भाव झालेला असून शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांची ही परिस्थिती सांगण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेले भाजपचे पदाधिकारी काही सेकंदांतच बाहेर पडले. पालकमंत्र्यांनी कुठलीही चर्चा केली नाही, तसेच या विषयावर गांभीर्यसुद्धा दाखविले नाही, असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

सध्या शेतकरी विविध संकटांतून जात आहेत. त्यातच सोयाबीनवर खोड किड्याचा प्रादुर्भाव झाला आहे. खोड किड्यामुळे सोयाबीनला शेंगा धरत नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत, असे डॉ. अनिल बोंडे व भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी सांगितले. डॉ. बोंडे यांच्यासह भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सुरू असलेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत प्रवेश केला. 

यावेळी निवेदन देण्यात आले, मात्र पालकमंत्र्यांनी निवेदन स्वीकारत सर्वांना सभागृहाबाहेर जाण्याची सूचना केल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सोबत सोयाबीनसुद्धा आणले होते, मात्र पोलिसांनी सर्वांना सभागृहाच्या बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे केवळ निवेदन देण्याची औपचारिकता भाजप कार्यकर्त्यांनी पार पाडली. सभागृहाबाहेर येताच डॉ. अनिल बोंडे, निवेदिता चौधरी व अन्य भाजप कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे म्हणाले, शेतकऱ्यांशी संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी आम्ही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना भेटण्यासाठी सभागृहात गेलो होतो. मात्र पालकमंत्र्यांना या मुद्याचे गांभीर्यच कळले नाही. त्यांच्याच सरकारमधील एक मंत्री कृषिमंत्र्यांच्या विभागावर ताशेरे ओढतात यातच सर्व काही आले.

पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले होते. त्यावेळी सभागृहात माझ्या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी उपस्थित होते. भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि ते सभागृहातून निघून गेले. पालकमंत्री म्हणून मला निवेदन दिले असते तर मी ते जबाबदारीने स्वीकारले असते.


संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image
go to top