Maharashtra Vidhansabha 2019 केदारांच्या विरोधात भाजपचे पोतदार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

नागपूर  : सावनेरचे किंग समजले जाणारे आमदार सुनील केदार यांच्या विरोधात भाजपने जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे येथे या दोघांमध्येच थेट लढत होणार आहे. पक्षसंघटनेचे मजबूत जाळे असल्याने भाजपने जातीपेक्षा कार्यकर्त्यांना येथे महत्त्व दिले आहे.

नागपूर  : सावनेरचे किंग समजले जाणारे आमदार सुनील केदार यांच्या विरोधात भाजपने जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे येथे या दोघांमध्येच थेट लढत होणार आहे. पक्षसंघटनेचे मजबूत जाळे असल्याने भाजपने जातीपेक्षा कार्यकर्त्यांना येथे महत्त्व दिले आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही जिल्ह्यात कॉंग्रेसचे सुनील केदार यांनी सावनेरमधून विजय मिळविला. त्यावेळी भाजपचे उमेदवार सोनबा मुसळे यांचा अर्ज बाद झाल्याचा फायदा त्यांना मिळाल्याची चर्चा होती. भाजपच्या महाजनादेश यात्रेदरम्यान कळमेश्‍वर येथे डॉ. पोतदारांना आशीर्वाद देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यापासूनच सावनेरमधून डॉ. राजीव पोतदार यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत होते. आज भाजपने जाहीर केलेल्या यादीतून पोतदार यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले. निष्ठावंत व शिस्तप्रिय व्यक्ती असलेले डॉ. पोतदार यांचे आव्हान कॉंग्रेसचे दिग्गज व दबंग नेते सुनील केदार यांच्यासमोर असणार आहे. कॉंग्रेसच्या पहिल्या यादीत सुनील केदार यांचे नाव निश्‍चित झाले.
आमदार केदार मागील पंचवीस वर्षांपासून सातत्याने सावनेर मतदारसंघात काम करीत आहेत. चारवेळा त्यांनी विजय मिळविला. जातीय समीकरणात ते फिट बसतात, असाही समज आहे. डॉ. पोतदार मागील निवडणुकीच्या वेळी इच्छुकांच्या यादीत प्रथमस्थानी होते. कुणबी कार्डावर विजय खेचून आणण्यासाठी भाजपने सोनबा मुसळे यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यांचा अर्ज बाद झाला. शिवसेनेच्या विनोद जीवतोडे यांना भाजपने पाठिंबा दिल्याने त्यांना 75 हजार मते मिळाली होती. भाजपकडून डॉ. पोतदार यांच्यासह सोनबा मुसळे व दिलीप जाधव दावेदार होते. मुख्यमंत्र्यांचे विश्‍वासू असलेल्या पोतदार यांना संधी मिळाली. पोतदार यांनी पक्षबांधणी करून निवडणुकीची पूर्ण तयारी केली. ते सुनील केदार यांना कितपत आव्हान देणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP potdar against Kedar