भाजपवाल्यांना मुनगंटीवारांमध्ये डॉ. आंबेडकर दिसतात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केल्याने चंद्रपूर जिल्ह्यात वाद झाला आहे. या प्रकरणी बसपतर्फे पाझारे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पाझारे यांच्या या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या बसपच्या कार्यकर्त्यांनी आज (मंगळवार) त्यांच्या कक्षात जाऊन शाई फेकली, तसेच खुर्चीला शेण फासले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ब्रिजभूषण पाझारे यांनी भाषण केले. हे भाषण करताना पाझारे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिसतात. मुनगंटीवार यांचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखेच आहे. सुधीर मुनगंटीवार यांची तुलना थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशीच केल्याने विरोधकांच्या हातात कोलित मिळाले आहे. पाझारे यांच्या वक्तव्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाच्या तालुकाध्यक्ष मनीषा गेडाम यांनी केला आहे. पाझारे यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीत केली आहे.

बसपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आज जिल्हा परिषदेच्या कार्यालयात जाऊन कक्षात शाई फेकली, तसेच खुर्चीला शेण फासले. या वेळी सभापती ब्रिजभूषण पाझारे कक्षात हजर नव्हते.

Web Title: BJP sudhir mungantiwar Dr. babasaheb ambedkar politics