Vidhan Sabha 2019 : भाजप निश्‍चिंत, कॉंग्रेसला चमत्काराची आशा 

file photo
file photo

नागपूर : एकाच समाजाला आपसात लढवण्याचा प्रयोग फसल्यानंतरही कॉंग्रेसने भाजपचे उमेदवार आमदार कृष्णा खोपडे यांच्याविरोधात त्यांच्याच समाजाचे पुरुषोत्तम हजारे यांना उमेदवारी देऊन पूर्व नागपूरमध्ये एकप्रकारे जुगारच खेळला आहे. या मतदारसंघात सातत्याने भाजपचे मताधिक्‍य वाढत असल्याने भाजप बऱ्यापैकी निश्‍चिंत झाली आहे. 
आमदार कृष्णा खोपडे यांनी आपल्या मतदारसंघात चांगलाच जम बसवला आहे. लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांना सर्वाधिक मताधिक्‍य याच मतदारसंघाने दिले. ते आता तिसऱ्यांदा विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. कुठलाही बडेजाव न बाळगता सहज उपलब्ध होणार आणि मतदारसंघातील कुठल्याही कार्यक्रमाला हजेरी लावणारा आमदार अशी त्यांची प्रतिमा आहे. तसेच परंपरागत भाजपची व्होट बॅंक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची फळी ही त्यांच्या जमेची बाजू आहे. 
एकेकाळी हाच मतदारसंघ कॉंग्रेसचे सतीश चतुर्वेदी यांच्या पाठीशी होता. त्यांचा बालेकिल्ला खोपडे यांनी उद्‌ध्वस्त केला. मागील विधानसभा निवडणुकीत चतुर्वेदी यांनी दक्षिण नागपुरात कूच केली. येथे ऐनवेळी दक्षिणेतील ऍड. अभिजित वंजारी यांना आणण्यात आले. त्यामुळे दोघेही पराभूत झाले. मात्र, वंजारी यांनी मतदारसंघ सोडला नाही. पुन्हा लढायचेच या उद्देशांनी त्यांनी पक्ष बांधणी सुरू केली. मात्र, दरम्यान घडलेल्या घडामोडींमुळे त्यांना आपल्या मतदारसंघावर पाणी सोडावे लागले. कॉंग्रेसच्या काही दिग्गज नेत्यांनी नगरसेवक असलेले पुरुषोत्तम हजारे यांना उमेदवारी दिली. विधानसभेच्या आखाड्यात ते नवखे आहेत. त्यांचा जनसंपर्कही मोजकाच आहे. ते सर्वस्वी सतीश चतुर्वेदी यांच्यावर अवलंबून आहेत. हजारे यांना उमेदवारी दिल्याने इतर इच्छुक नाराज आहेत. 
अभिजित वंजारी दक्षिणेत गिरीश पांडव यांच्या प्रचाराला जास्त वेळ देत आहेत. प्रचाराचा धुराळा उडवणारा एकही नेता पूर्वमध्ये नसल्याने येथील रंगत फिकी पडली आहे. बसप व वंचित आघाडीचे येथे उमेदवार आहेत. तेसुद्धा कॉंग्रेसमधून आपला वाटा काढून घेणार आहेत. आभा पांडे यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र, त्यांनी माघारही घेतली. भाजपच्या कार्यकाळात झालेला विकास, झोपडपट्टीधारकांना दिलेले पट्टे, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मिळालेली घरे हे खोपडे यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. सुरुवातीला शिवसेनेने आपला दबाव वाढवण्याचा येथे प्रयत्न करून बघितला. स्मार्टसिटीच्या विरोधात बैठका घेऊन आमदारांना टार्गेट करण्याचेही प्रयत्न केले. मात्र, निवडणूक जाहीर होताच येथील शिवसेना मवाळ झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com