विदर्भात भाजपाला दणदणीत यश 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

- राष्ट्रवादीला जबर हादरा; केवळ पुसद राखले 
- कॉंग्रेस-राष्ट्रवादीने अनेक जागा गमावल्या 
- एएमआयएमने यवतमाळ जिल्ह्यात अस्तित्व दाखवले 
- अनेक ठिकाणचे नगराध्यक्ष 'अल्पमतात' 

नागपूर : राज्यातील नगरपालिका निवडणुकीच्या रविवारी झालेल्या पहिल्या टप्प्यात विदर्भात झालेल्या 44 नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी आज सोमवारी झाली. या निवडणुकीत तब्बल 26 नगराध्यक्षपदांवर ताबा मिळवून भाजपने दणदणीत यश मिळवले.

शिवसेनेने स्वबळावर 5, तर एका ठिकाणी स्थानिक आघाडीसोबत, असे 6 नगराध्यक्ष निवडून आणले. कॉंग्रेसचे सहा नगराध्यक्ष, तर भारिप-बमसंचे तीन नगराध्यक्ष निवडून आले.

अगोदर 23 ठिकाणी सत्तेत असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला या निवडणुकीत जबर हादरा बसला असून, राष्ट्रवादीला तर केवळ पुसदची सत्ता स्वतःकडे कायम ठेवता आली. नगरपालिकांसोबतच सिंदेवाही (जि. चंद्रपूर) येथील नवीन नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने निर्भेळ बहुमत मिळवले. 

विशेष म्हणजे असाउद्दीन ओवैसी याच्या एएमआयएम या पक्षाने एकाही ठिकाणी सत्ता मिळवली नसली तरी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे 7, तर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे 3 नगरसेवक निवडून आणून आपले अस्तित्व दाखवले. यवतमाळातील घाटंजीत स्थानिक विकास आघाडीने तर याच जिल्ह्यातील दिग्रस येथे अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे जनता त्रस्त आहे व त्याचा फटका शहरी मतदार या निवडणुकीत भाजपला देतील, अशी शक्‍यता वर्तवली जात होती; पण तसे न होता मतदारांनी भाजपवर आपला विश्‍वास व्यक्त केला. 

वर्धा जिल्ह्यात तर सर्व सहाही जागा भाजपने जिंकल्या, तर अमरावती जिल्ह्यातील 9 जागांपैकी 7 जागा भाजपने, तर एक जागा शिवसेनेने जिंकली. भाजपचा वरचष्मा चंद्रपूर जिल्ह्यातही दिसून आला. तेथील एका नगरपंचायतीसह चार जागा भाजपने ताब्यात घेतल्या. अमरावती व चंद्रपूर जिल्ह्यात कॉंग्रेसला एक-एक जागा जिंकता आली. यवतमाळ जिल्ह्यात मात्र शिवसेनेचा वरचष्मा राहिला. या पक्षाने तीन जागा जिंकल्यात, तर भाजपने दोन जागी विजय मिळविला. राष्ट्रवादी, अपक्ष अणि स्थानिक आघाडीने प्रत्येकी एक-एक जागा जिंकली. 

विदर्भातील नगराध्यक्षपदाचे पक्षीय बलाबल 
भाजप - 26 
शिवसेना - 5 
अकोट विकास आघाडी - 1 (शिवसेना युती) 
कॉंग्रेस - 6 
राष्ट्रवादी - 1 
भारिप-बमसं - 3 
घाटंजी विकास आघाडी -1 
अपक्ष - 1 
एकूण- 44 

Web Title: BJP wins big in Vidarbha