अकोला : प्रॉपर्टी ब्रोकरच्या हत्येप्रकरणी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्षांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मे 2019

घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विक्रम उर्फ छोटू श्रीराम गावंडे, त्यांचे वडील व माजी पोलिस निरीक्षक श्रीराम गावंडे, धीरज गावंडे पोलिसांना शरण आल्याची प्राथमिक माहिती आहे. 

अकोला : प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले आणि अकोला शहराच्या पहिल्या महापौर सुमनताई गावंडे यांच्या कुटुंबातील वाद सोमवारी (ता.६) विकोपाला गेला. या वादातून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात दिवसाढवळ्या दुपारी बारा वाजता अग्निरोधक यंत्राचे (फायर इस्टिंग्यूशर) डोक्यात घालून हुंडीवाले यांची निर्घून हत्या करण्यात आली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली.

घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विक्रम उर्फ छोटू श्रीराम गावंडे, त्यांचे वडील व माजी पोलिस निरीक्षक श्रीराम गावंडे, धीरज गावंडे पोलिसांना शरण आल्याची प्राथमिक माहिती आहे. 

एसपींच्या बंगल्याजवळच घडले हत्याकांड
सार्वजनिक न्यास नाेंदणी कार्यालय (धर्मदाय आयुक्त) जिल्हा पाेलिस अधीक्षक एस. राकेश कलासागर यांच्या शासकीय बंगल्याला लागूनच आहे. शिवाय अशाेक वाटीका ते नेहरु पार्क राेडवर सदर कार्यालय असल्याने त्याठिकाणी नेहमीच नागरिकांची गर्दी असते. अतिशय वर्दळीच्या ठिकाणी हत्या झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
 
माजी महापौर सुमनताई गावंडे यांची चौकशी
स्वामी विवेकानंद राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळावर भाजपच्या माजी महापौर व विद्यमान नगरसेविका सुमनताई श्रीराम गावंडे या २००१ पासून अध्यक्ष आहेत. तर मृतक किसन यमाजी हुंडीवाले सचिव होते. पोलिसांनी जाहीर केलेल्या हल्लेखोरांच्या नावमध्ये सुमनताई गावंडे यांचे पती सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीराम गावंडे व त्यांच्या तीन मुलांचा सामावेश आहे. त्यामुळे पोलिसांनी घटनेनंतर दुपारी सुमनताई गावंडे व त्यांच्या दोन सुनांना त्यांच्या घरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून हल्लेखोरांची माहिती घेण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

मृतकाच्या वकीलावर सुध्दा हल्ला
स्वामी विवेकानंद राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळचे कार्यकारी मंडळ बदलण्यावरून मृतक हुंडीवाले तसेच माजी महापाैर व विद्यमान नगरसेविका सुमनताई गावंडे यांच्यात न्यास नाेंदणी कार्यालयात सुनावणी सुरू आहे. मृतकाच्या वतीने अ­ॅड. नितीन धूत हे बाजू पाहत आहेत. सुनावणीनंतर हुंडीवाले व त्यांचे वकील धूत यांच्यावर आराेपींनी हल्ला केला. त्यात ऍड. धूत गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कार्यालयात सीसी कॅमेऱ्यांचा पत्ताच नाही
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सहाय्यक संस्था निबंधक यांच्या कार्यालयात आरोपी हुंडीवाले यांची हत्या करून फरार झाले होते. यामध्ये पोलिसांनी घटनाक्रम जाणून घेण्यासाठी व आरोपींचा शोध घेण्याकरिता कार्यालयात सीसी कॅमेऱ्यांची पाहणी केली. परंतु कार्यालयात सीसी कॅमेरेच उपलब्ध नसल्याचे यावेळी आढळून आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP yuva Morcha state vice president arrested for murder case in Akola