अकोला महापौरपदी भाजपच्या अर्चना मसने

AKOLA MAYOR
AKOLA MAYOR

अकोला : अकोला महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता पार पडली. महापौरपदी भाजपच्या अर्चना जयंतराव मसने आणि उपमहापौरपदी राजेंद्र गिरी यांची निवड झाली. काँग्रेसने  संख्या बळ नसतानाही निवडणूक लढविली. राज्यातील बदलत्या राजकीय समिकरणामुळे काँग्रेसच्या उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची साथ मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र शिवसेना तटस्थ राहली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अनुपस्थित राहिले. 
महापालिकेतील पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नव्याने पदाधिकाऱ्यांची निवडणूक घेण्यात आली. अकोला महापौरपद सर्वसाधारण महिला राखीव होते. भाजपकडून सोमवारीच अर्चना मसने आणिराजेंद्र गिरी यांची नावे महापौर आणि उपमहापौरपदासाठी निश्‍चित करण्यात आली होती. शुक्रवारी
निवडणुकीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काम बघितले. काँग्रेसच्या उमेदवार अजराबी नजरीन आणि पराग कांबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक घ्यावी लागली. भाजपतर्फे डमी उमेदवारी दाखल करणारे अनुराधा नावाकार आणि
दीपक मनवाणी यांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले. महापौरपदासाठी भाजपच्या अर्चना मसने आणि काँग्रेस अजराबी नजरीन यांच्यात लढत झाली. त्यात मसने यांनी 48 विरुद्ध 13 मतं मिळवित विजय मिळविला. उपमहापौरपदासाठी भाजपचे राजेंद्र गिरी आणि काँग्रेसची पराग कांबळे यांच्यात लढत झाली. त्यात
गिरी यांनी 48 विरुद्ध 13 मतांनी विजय मिळविला. अकोला महापालिकेत एकूण 80 सदस्य असून, पाच स्वीकृत सदस्य आहेत. 

शिवसेना तटस्थ, राष्ट्रवादी गैरहजर
महापौर आणि उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे आठ सदस्य आणि एमआयएमचा एक सदस्य यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. राज्यातील बदलत्या सत्ता समिकरणाचा परिणाम येथे दिसून आला नाही. उलट राष्ट्रवादी काँग्रेसनेही मित्र पक्ष काँग्रेसला साथ देण्याऐवजी त्यांचे पाचही
नगरसेवक अनुपस्थित राहिले. 

भारिपचे तीन व भाजपच्या एका सदस्याची अनुपस्थिती
भारिप-बमसंचे सध्याची वंचित बहुजन आघाडीचे तीन सदस्य महापालिकेत आहेत. त्यांनी आजच्या निवडणुकीत सहभाग घेतला नाही. त्यांच्यासोबचत भाजपच्या माजी महापौर सुमनताई गावंडे याही अनुपस्थित राहिल्यात. 

अंतर्गत नाराजीमुळे भाजपची व्हिप
महापौर आणि उपमहापौर निवडीवरून भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असल्याने सोमवारी उघड झाले होते. त्यामुळे भाजपच्या सदस्यांना निवडणुकीच्या आधी व्हिप जारी करण्यात आला होता. त्यामुळे एकही नगरसेवक फुटला नाही. 

आमदार सावरकरांची उपस्थिती
महापौर आणि उपमहापौर निवडीवरून भाजपमध्ये अंतर्गच नाराजी होती. त्यामुळे ऐनवेळी काही गडबड होऊ नये म्हणून आमदार रणधीर सावरकर महापालिका परिसरात जातीने उपस्थित होते. भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मागंटे पाटील हेही परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांनी दोन्ही
पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी मावळते महापौर विजय अग्रवाल यांचीही उपस्थिती होती. 

निवडणुकीनंतर जल्लोष
महापौर आणि उपमहापौरांची निवड झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांची मिरवणूक काढून  जल्‍लोषात स्वागत केले. महापालिका परिसरात आतषबाजी करण्यात आली. मिरवणूक टॉवर मार्गे महापौर यांच्या प्रभागात उमरीतील मनसे वाडीपर्यंत काढण्यात आली. येथे शुभेच्छ देणाऱ्यांनी गर्दी केली
होती.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com