भाजपचे मिशन महिला बळकटीकरण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

नागपूर - शहराचे महापौरपद महिला खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असून, नगरसेविकांमधून महापौरांचा शोध अद्याप सुरू आहे. भाजपने आता उपमहापौरपदही नगरसेविकांमधूनच देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. महापौर व उपमहापौरपदही नगरसेविकाच राहणार असल्याने भाजप नागपुरात मिशन महिला बळकटीकरण राबवित असल्याची चर्चा रंगली आहे. 

नागपूर - शहराचे महापौरपद महिला खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असून, नगरसेविकांमधून महापौरांचा शोध अद्याप सुरू आहे. भाजपने आता उपमहापौरपदही नगरसेविकांमधूनच देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. महापौर व उपमहापौरपदही नगरसेविकाच राहणार असल्याने भाजप नागपुरात मिशन महिला बळकटीकरण राबवित असल्याची चर्चा रंगली आहे. 

शहराच्या महापौरपदासाठी नंदा जिचकार, चेतना टांक, रूपा रॉय, विशाखा मोहोड यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. आज या चर्चेत अनुभवी नगरसेविकेची महापौरपदी निवड केली जाणार असल्याची भर पडली. सोबतच महापौरपदासाठी नगरसेविकेला यापूर्वी प्रशासकीय व सभेच्या कामकाजाचा अनुभव नसल्यास उपमहापौरपदी अनुभवी नगरसेविकाला संधी देण्याचा पर्याय पुढे आला आहे. अनुभवी उपमहापौर असल्यास नव्या महापौरांना कामकाजाबाबत त्या प्रशिक्षित करू शकतील, असा एक मतप्रवाह आहे. एवढेच नव्हे तर दोन्ही पदे महिलांना देऊन महिला सशक्तीकरणाचा संदेशही देता येईल, असे भाजपमधील सूत्राने सांगितले. त्यामुळे एक दगडात दोन पक्षी मारण्याची रणनीती भाजपने आखल्याचे दिसून येत आहे. 

रविवारी महापौरांची निवड 
महापौर निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, नवनिर्वाचित नगरसेवकांना याबाबत नोटीस देण्यात आली आहे. 1 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत महापौरपदासाठी नामांकन दाखल करण्यात येणार आहे. 5 मार्च रोजी महापौर निवडीसाठी सभा होणार आहे. सभा सुरू होताच नामांकन अर्जाची छाननी होणार असून, त्यानंतर 15 मिनिटे अर्ज मागे घेण्यासाठी संधी देण्यात येईल. या वेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे पीठासिन अधिकारी राहतील. 

कॉंग्रेसचा निर्णय गुरुवारी मुंबईत 
महापौरपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवार देईल की नाही? याबाबत उत्सुकता आहे. महापौरपदाची निवडणूक लढविण्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी 2 मार्च रोजी संपूर्ण शहराध्यक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत निर्णय होणार असल्याचे शहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सांगितले. याच बैठकीत महापालिकेतील विरोधी पक्ष नेत्याचीही निवड केली जाणार आहे.

Web Title: BJP's Mission for Strengthening Women