Election Results 2019 : उमरेड विधानसभा मतदारसंघ : भाजपचे सुधीर पारवे 1840 मतांनी आघाडीवर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

उमरेड विधानसभा मतदारसंघात राजेंद्र मुळक यांचा प्रभाव आहे. ते यंदा उमेदवार नसल्याने उमरेडवर लक्ष केंद्रित केले आहे. यातूनच सर्वांचा विरोध पत्करून त्यांनी राजू पारवे यांना कॉंग्रेसची उमेदवारी दिल्याची चर्चा आहे.

नागपूर : उमरेड विधानसभा मतदारसंघात पारवे विरुद्ध पारवे असा सामना रंगला असून, दोन चुलत भावांमध्ये होत असलेल्या या लढतीत विद्यमान भाजप आमदार सुधीर पारवे 1840 मतांनी आघाडीवर आहेत. भाजपने तिसऱ्यांदा आमदार सुधीर पारवे तर कॉंग्रेसने त्यांचेच चुलतबंधू राजू पारवे यांना उमेदवारी देऊन येथे रंग भरला. कॉंग्रेसच्या पारवेंसाठी राजेंद्र मुळक यांनी ताकद लावली. सुधीर पारवे यांनी स्वभावाप्रमाणे शांतचित्ताने प्रचार केला. 
उमरेड विधानसभा मतदारसंघात राजेंद्र मुळक यांचा प्रभाव आहे. ते यंदा उमेदवार नसल्याने उमरेडवर लक्ष केंद्रित केले आहे. यातूनच सर्वांचा विरोध पत्करून त्यांनी राजू पारवे यांना कॉंग्रेसची उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. ते स्वत: राजू पारवे यांच्या प्रचारासाठी धुराळा उडवीत आहे. राजू पारवे यांनी आतापर्यंत दोन वेळा मतदारसंघ पिंजून काढला. आपला माणूस असा ते स्वत:चा प्रचार करीत आहे. त्यांना संजय मेश्राम यांचेही पाठबळ असल्याने हौसला बुलंद झाला. ग्रामीण भागात स्वत: मुळक राजू पारवे यांच्यासह दौरे केले. राजू पारवे गावागावांतून प्रचार करीत असले तरी त्यांच्यासमोर संघटित असलेल्या भाजपचे आव्हान होते. दोन वेळा विजय मिळविणारे सुधीर पारवे भाजपच्या संघटित प्रचारामुळे निवडून आले आहे. मागील निवडणुकीत बसपकडून लढणारे रुक्षदास बन्सोड निवडणुकीसाठी तयार नसताना वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी दिली. मागील निवडणुकीच्या वेळी ते दुसऱ्या स्थानी होते. यावेळी ते कुणाची मते खाणार यावरही विजयी उमेदवाराचे भविष्य ठरणार आहे. राजू व सुधीर पारवे या दोन्ही चुलत भावंडांविरुद्ध गटा-गटात वेगवेगळ्या चर्चा असल्या तरी दोघांतच खरी लढत आहे, हे मात्र तेवढेच खरे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's Sudhir Parvez leads by 1840 votes