मतांच्या टक्केवारीवर काळे ढग! 

file photo
file photo

अकोला ः जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात सकाळी सात वाजतापासून मतदानाला उत्साहात सुरुवात झाली. मात्र, सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने मतांच्या टक्केवारीवर काळे ढग असल्याचे दिसत आहे. 
जिल्ह्यातील पाच मतदारसंघात एकूण 68 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये अकोला पश्‍चिम, अकोला पूर्व, बाळापूर, अकोट मतदारसंघासह मूर्तिजापूर या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघाचा समावेश आहे. पाचही मतदारसंघातून एकूण 15 लाख 77 हजार 154 मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. यामध्ये पुरुष मतदार आठ लाख 12 हजार 181आहेत तर महिला मतदारांची संख्या सात लाख 61 हजार 864 एवढी आहे. एकूण मतदान केंद्रांची संख्या 1,703 आहे. मतदान निर्भिडपणे पार पडावा यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातून पोलिसांची कुमक 
निवडणूक प्रकिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मध्यप्रदेशातील पोलिस बंदोबस्तासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तब्बल 1,650 पोलिस कर्मचाऱ्यांचा तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रशासनाने दिली. सोमवारी निवडणुकांसाठी पोलिस प्रशासनाने चोख नियोजन केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून तर सभा, फेऱ्या व देशपातळीवरील नेत्यांची रेलचेल यामुळे संपूर्ण दोन आठवडे पोलिसांसाठी कसरतीचे ठरले. जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनी निवडणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी काटेकोर नियोजन केल्यामुळे प्रचारादरम्यान कुठेही अप्रिय घटना घडली नाही. आता पोलिसांसमोर आव्हान आहे ते मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे. स्थानिक पोलिसांच्या जोडीला आता परजिल्ह्यासह परराज्यातूनही कुमक मागवण्यात आली आहे. 
असा फौजफाटा तैनात 
पद संख्या 
डीवायएसपी 06 
पोलिस निरीक्षक 19 (स्थानिक) 
पोलिस निरीक्षक 23 (बाहेर जिल्ह्यातील) 
एपीआय, पीएसआय 74 
होमगार्ड 900 
होमगार्ड 200 (मध्यप्रदेशातील) 
पोलिस कर्मचारी 300 (मध्यप्रदेशातील) 
डीवायएसपीसह पोलिस निरीक्षक 300 (बाहेर जिल्ह्यातील) 
कंपनी 06 
पोलिसांसाठी खाजगी वाहने 120 
12 मतदान केंद्र अती संवेदनशील 
जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघातील 17003 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. यामध्ये 12 मतदान केंद्र अती संवेदनशील असून, 36 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. या अती आणि संवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांचा अतिरीक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, सोबतीला सीसी कॅमेरेही असणार आहे.
पोलिस फोर्स डिप्लॉयमेंट प्लॅन तयार 
कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस फोर्स डिप्लॉयमेंट प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्यात पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली एक अपर पोलिस अधीक्षक, चार पोलिस उपअधीक्षक बंदोबस्तासाठी राहणार आहेत. तसेच प्रतिबंधात्मक कारवाई, खाजगी परवानाधारकांची शस्त्रे जमा करणे यासारख्या कारवायाही करण्यात आल्या आहेत. एकुणच निवडणूक निर्भय व शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com