विदर्भात फडकले काळे झेंडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 मे 2017

स्वतंत्र विदर्भाकरिता निवडणूकपूर्व मतांचा जोगवा मागून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या भूमिकेविरुद्ध विदर्भवाद्यांनी आज, सोमवारी महाराष्ट्रदिनी "काळा दिन' पाळला. विदर्भात ठिकठिकाणी आंदोलन करून वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. काळे झेंडे फडकविण्यात आले.

नागपूर - स्वतंत्र विदर्भाकरिता निवडणूकपूर्व मतांचा जोगवा मागून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या भूमिकेविरुद्ध विदर्भवाद्यांनी आज, सोमवारी महाराष्ट्रदिनी "काळा दिन' पाळला. विदर्भात ठिकठिकाणी आंदोलन करून वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. काळे झेंडे फडकविण्यात आले.

यवतमाळ शहरात लोकनायक बापूजी अणे यांच्या पुतळ्याजवळ विदर्भाचा झेंडा फडकविण्यात आला. त्यानंतर याच चौकात शिवसेनेतर्फे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 106 हुतात्मे, शहीद सैनिकांना अभिवादन करण्यात आले. विदर्भ अन्याय निवारण समितीतर्फे येथील नेताजी भवनाजवळ "रास्ता रोको' करीत काळे झेंडे फडकविण्यात आले.

अमरावतीत मनसेचा राडा
अमरावती शहरातील राजकमल चौकात महाराष्ट्रदिनी काळा दिन पाळून स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी धरणे देणाऱ्या विदर्भवाद्यांच्या मंडपात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच राडा केला. तेथील खुर्च्यांची तोडफोड करून बॅनर फाडण्यात आले. तसेच मंडपात बसलेल्या दोन महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. अखेर पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
अकोला शहरातही विदर्भवाद्यांच्या आंदोलनात शिवसैनिकांनी राडा केला. त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीचे बॅनर फाडले तसेच तेथे उपस्थित काही कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली.

भंडारा शहरात विदर्भाचा झेंडा फडकवून रक्ताक्षरी अभियान राबविण्यात आले. आता आम्हाला वेगळा विदर्भ घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असा इशारा देण्यात आला. गोंदिया शहरातील डॉ. आंबेडकर चौकात विदर्भ राज्य आघाडीतर्फे घोषणा देऊन स्वतंत्र विदर्भ राज्य देण्यात यावे, अशी मागणी विदर्भवाद्यांनी केली. काळ्या फिती लावून त्यांनी शासनाचा निषेध केला.

चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, राजुरा येथे विदर्भवाद्यांनी "निषेधदिन' पाळला. राजुरा येथे समर्थकांनी काळ्या फिती लावून स्वतंत्र विदर्भ राज्याचे झेंडे व फलक झळकविले. तसेच वेगळ्या विदर्भ राज्याच्या घोषणा दिल्या. चंद्रपूर शहरातील जनता महाविद्यालयात प्राचार्य अशोक जीवतोडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाऐवजी विदर्भ राज्याचा ध्वज फडकविण्यात आला.

वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विदर्भवाद्यांनी घोषणाबाजी केली. भाजप स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्‍नावर घुमजाव करीत आहे, असा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष निळकंठ घवघवे यांनी केला.

रक्तस्वाक्षरीचे पाठविणार पंतप्रधानांना पत्र
स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा प्रस्ताव येणाऱ्या संसद अधिवेशनात आणावा, तसेच भाजपच्या भुवनेश्‍वर अधिवेशनात घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीचे पत्र विदर्भवादी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्तस्वाक्षरी करून पाठविणार आहे.

Web Title: Black Flag displayed in Vidharbha