"तेथील' सौंदर्यावर काळी नक्षली छाया

मिलिंद उमरे 
Friday, 27 December 2019

खरेतर गडचिरोली जिल्ह्याला निसर्गादेवतेने भरभरून दान दिले आहे. आययूसीएनच्या रेड डाटाबुकमध्ये नोंद असलेली अतिदुर्मिळ रानम्हैस येथील कोलामार्का वनक्षेत्रात बघायला मिळते.

गडचिरोली : निसर्गसमृद्ध व संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र अंगाखांद्यावर मिरवणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. फक्त पर्यटनस्थळांच्या भरवशावरच हा जिल्हा आर्थिक क्षेत्रात प्रचंड मोठी झेप घेऊ शकतो. पण, जिल्ह्यातील बहुतांश पर्यटन स्थळे नक्षलग्रस्त भागात असून त्यावर नक्षलवाद्यांची हिंसक सावली असल्याने या स्थळांचा विकास एक दिवास्वप्नच होऊन बसले आहे. 

निसर्गाने केलीय सौंदर्याची उधळण 

खरेतर गडचिरोली जिल्ह्याला निसर्गादेवतेने भरभरून दान दिले आहे. आययूसीएनच्या रेड डाटाबुकमध्ये नोंद असलेली अतिदुर्मिळ रानम्हैस येथील कोलामार्का वनक्षेत्रात बघायला मिळते. महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेली लालचुटुक, चॉकलेटी रंगाची शेकरू किंवा देवखार (जायंट स्क्‍विरल) कोनसरी, कोपेलाच्या रानात बागडत असते. अतिदुर्मिळ पट्टेरी मण्यार, जेरडॉनचा धाविक, मलबार धनेश, पिसोरी किंवा उंदीर हरीण अशा अनेक दुर्मिळ, प्राणी पक्ष्यांसह येथे जगभरात दुर्मिळ असलेल्या गिधाडांच्या अनेक प्रजाती बघायला मिळतात. जिल्ह्यात भामरागड, चपराळा व प्राणहिता ही तीन वन्यजीव अभयारण्ये आहेत. आपल्या शिखरावर जवळपास चार तलाव सांभाळणारे कुरखेडा तालुक्‍यातील खोब्रामेंढा, राजा पुरणसिंग आणि त्याच्या पत्नीच्या अमरप्रेमाची व गोंडराजांच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारे टिपागड असून याच्या शिखरावरील तलाव बाराही महिने पाण्याने काठोकाठ भरलेला असतो. 

सर्वाधिक जंगल व दुर्मिळ प्राणी-वनस्पती 

दगडावर दगड आदळल्यास संगीताचे स्वर ऐकू येणारा अद्‌भुत बाजागडचा डोंगर, टाळी वाजवताच थुईथुई नाचणाऱ्या पाण्याचे व्यंकटापूरच्या गर्द रानातील कुंड, कुंकवासारखी माती असलेले कुंकुमेश्‍वर, महाभारतातील लाक्षागृह असून येथे लाखेच्या विटा आजही मिळतात व पांडवांनी इथल्याच भुयारी मार्गाचा वापर केल्याची कथा नागरिक छातीठोक सांगतात ते लख्खामेंढा पहाड, अतिदुर्मिळ गिधाडांनी प्रजननासाठी पसंत केलेले देचलीपेठा, बारमाही धबधब्यांचा अखंड नाद ऐकवणारे व बडा माडीया आदिवासी जमातीचा रहिवास असलेला बिनागुंडाचा परिसर, जागतिक जैवविविधता वारसा स्थळ यादीत नोंद असलेले व अनेक दुर्मिळ महावृक्षांना सांभाळणारे ग्लोरी ऑफ आलापल्लीचे रान, भामरागड येथील तीन नद्यांचा संगम, सिरोंचा तालुक्‍यातील सोमनूर येथील संगम क्षेत्र, दहाहून अधिक भव्य हत्ती असलेला कमलापूरचा हत्ती कॅम्प, अशी एक ना अनेक पर्यटन स्थळे गडचिरोली जिल्ह्यात आहेत. 

Image may contain: outdoor
गडचिरोली : नक्षल्यांनी तोडफोड केलेले कमलापूर येथील बांधकाम. 

नक्षलवाद्यांकडून हत्ती कॅम्पची तोडफोड 

जगात कुठे नसतील असे प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पतींनी समृद्ध अशी ही पर्यटनस्थळे कधीच विकसित झाली नाहीत. मागील काही वर्षांत कमलापूरचा हत्ती कॅम्प पर्यटन स्थळ म्हणून बऱ्यापैकी नावारुपास आला होता. जिल्हा प्रशासन व वनविभागाने कठोर परिश्रम घेत हे स्थळ विकसित केले. पण, डिसेंबर महिन्यात नक्षलवाद्यांनी त्यांच्या पीएलजीए (पीपल्स लिबरेशन गुरील्ला आर्मी) सप्ताहादरम्यान 2 डिसेंबर रोजी या स्थळातील बांधकामाची तोडफोड करून या पर्यटनस्थळाच्या विकासालाच नख लावले. नक्षलवाद्यांची अशी हिंसक कृत्ये व दहशत यामुळे या पर्यटन स्थळांचा विकास रखडला असून येथे पर्यटकही फिरकेनासे झाले आहेत. 

...तर झाले असते "मिनी आफ्रिका' 

जैवविविधतेने समृद्ध आपल्या दुर्मिळ जंगलांसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या आफ्रिका या देशाने सेरेंगेटी, मसाईमारा आदी परिसरातील वन व वन्यजीवांच्या दर्शनाची सुलभ सोय करून चांगली पर्यटन स्थळे विकसित केली. त्यामुळे एकट्या पर्यटनाच्या भरवशावर हा देश मोठी परदेशी गंगाजळी जमवत आपला विकास साधत आहे. याच धर्तीवर गडचिरोलीतील पर्यटनस्थळाचा विकास करून या जिल्ह्याला "मिनी आफ्रिका'अशी ओळख मिळू शकली असती. पण, नक्षलवाद्यांची काळी सावली या पर्यटनस्थळांवर असल्याने हे स्वप्न स्वप्नच राहणार की, काय असे वाटत आहे. 

नक्षलवाद्यांमुळेच निसर्गसौंदर्याने समृद्ध गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास रखडला, हे खरे आहे. पण, आम्ही नक्षलवाद्यांची ही काळी छाया लवकरच दूर करू. या पर्यटनस्थळांचा विकास झाला असता, तर अनेकांच्या हाताला रोजगार मिळाला असता. या जिल्ह्याला पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी सारेकाही मिळाले असते. पण, नक्षलवाद्यांनी खोडा घातला आहे. त्यांनी कमलापूर उद्‌ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. पण, आम्ही हे स्थळ पुन्हा विकसित करीत आहोत. नक्षलवाद संपवून पर्यटनस्थळांसोबतच जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रांच्या विकासाचा मार्ग मोकळा करणे, हेच आमचे ध्येय आहे. 
- शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक, गडचिरोली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "A black nostalgic shadow over the beauty 'of `That` place