‘ब्लॅकमेलींग’ने घेतले दोन जीव!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 डिसेंबर 2019

शिरपूर येथील प्रेमी युगुल आत्महत्येच्या प्रकरणाने आता नाट्यमय व तेव्हढेच संतापजनक वळण घेतले आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शिरपूर जैन (जि.वाशीम) : सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराने देश सुन्न झाला असताना, हे अत्याचार कमी होण्याचे नाव घेत नाहीत. दोन दिवसांपूर्वी शिरपूर येथे प्रेमी युगुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेने आता नाट्यमय व तेव्हढेच संतापजनक वळण घेतले असून, शिरपूर येथील पाच जणांनी या प्रकरणातील महिलेला शरीर सुखासाठी ‘ब्लॅकमेल’ केल्यामुळे दोघांनीही जीवनयात्रा संपविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिरपूर पोलिसांत पाच जणांविरोधात शुक्रवारी (ता.20) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत शिरपूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील विवाहित महिला राधा भगवान अढाव व अविवाहित सुरज पवार दोघेही (रा.शिरपूर) प्रेमी युगुलाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब गुरुवारी (ता.19) सकाळी उघडकीस आली होती. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविले होते. मात्र, त्यानंतर या प्रकरणी आज (ता.20) मृतक महिलेचे मामा रामकिसन इंगोले (रा.कोठा, ता. मालेगाव) यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. 

हेही वाचा - वऱ्हाडचे समाजस्वास्थ बिघडतेय!

Image may contain: 1 person, closeup
राधा अढाव

 

आरोपींची नावे अजून गुपीत
हे पाचही आरोपी फरार झाल्याने पोलिस विभागाकडून त्यांची नावे मात्र कळू शकली नाहीत. या प्रकरणामध्ये मयत राधा अढाव हिला हे पाच आरोपी शरीर सुखाच्या मागणीकरिता ‘ब्लॅकमेल’ करीत होते. अशा आशयाची चिठ्ठी मयत सूरज पवार याच्या खिशात पोलिसांना आढळून आल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Image may contain: 1 person, closeup
सूरज पवार

 

पोलिस आरोपींच्या मागावर
ही घटना घडल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, अपर पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. पवन बनसोड यांनी आरोपींना जेरबंद करण्यासाठी तपास पथके नेमले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना लवकरच जेरबंद करण्यात येईल, अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blackmailing took two lives!