स्वतःवरच केले ब्लेडने वार! दिग्रसमध्ये शिवसैनिकाचे कृत्य 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

भाजपचे सरकार स्थापन झाल्याचा धक्का सहन न झाल्याने रमेश जाधव याने तत्काळ दिग्रस येथील मानोरा चौकात स्वतःवर ब्लेडने वार करावयास सुरवात केली.

दिग्रस (जि. यवतमाळ)  : शिवसेनेच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यास काही अवधी शिल्लकअसताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या छुप्या पाठिंब्याने भाजपाने सरकार स्थापन केल्याची बातमी दूरचित्रवाहिन्यांसह सोशल मीडियाच्या माध्यमातून आज सकाळी सर्वांच्या कानी पडली. यामुळे उद्विग्न झालेल्या एका शिवसैनिकाने स्वतःस स्वतःच्या अंगावर ब्लेड मारून स्वतःला जखमी केले. ही घटना आज, शनिवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास दिग्रस येथील मानोरा चौकात घडली. 

ती ब्रेकिंग न्यूज पसरली अन्‌... 

रमेश बाळू जाधव हा 45 वर्षीय व्यक्ती वाशीम जिल्ह्यातील उमरी खुर्द (ता. मानोरा) येथील रहिवासी असून स्वतःला शिवसैनिक असल्याचे सांगतो. काही कामानिमित्त तो दिग्रस येथे आला होता. राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार स्थापन होण्याच्या मार्गावर असतानाच अचानक बाजू पलटली. आज सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते अजित पवार यांच्यासह भाजपाचे सरकार स्थापन झाल्याची "ब्रेकिंग न्यूज' सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतल्याचे वृत्तही वृत्तवाहिन्यांवर झळकले. 

स्वतःवरच ब्लेडने वार 

भाजपचे सरकार स्थापन झाल्याचा धक्का सहन न झाल्याने रमेश जाधव याने तत्काळ दिग्रस येथील मानोरा चौकात स्वतःवर ब्लेडने वार करावयास सुरवात केली. ही बाब तेथे कर्तव्यावर असलेले वाहतूक हवालदार युवराज चव्हाण यांच्या लक्षात आली. त्यांनी त्वरित डीबी पथकाच्या मदतीने रमेशला ताब्यात घेतले व ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रमेशची प्रकृती धोक्‍याबाहेर असल्याचे ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. 

दिग्रसमध्ये काही काळ तणाव 

याबाबत रमेशला विचारले असता, शिवसेनेच्या सरकारसह उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न झाल्याने हे पाऊल उचलले, असे तो म्हणाला. प्राथमिक उपचार करून त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. 
दरम्यान, राज्यात झालेल्या राजकीय भूकंपाचे पडसाद राज्यातील सामान्य जनतेत उमटत आहेत. दिग्रसमध्ये घडलेल्या या घटनेने काही काळ तणाव निर्माण झाला होता. 

अनेकांची उडाली झोप 

महाआघाडी सरकारच्या सत्ता स्थापनेची स्वप्ने बघणाऱ्या नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांचा आज सकाळी अचानक हिरमोड झाला. राष्ट्रवादीने भाजपासोबत जाऊन अचानक सत्ता स्थापन केल्याने शिवसैनिकांनासह सर्वांनाच मोठा धक्का बसला. यातूनच रमेश जाधव याने स्वतःच्या शरीरावर ब्लेडने मारून घेतले. संपूर्ण राज्यातसुद्धा या राजकीय भूकंपामुळे अनेकांच्या झोपी उडाल्या. आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blade struck on himself! Action of Shiv Sena's actvist in Digras