नागपूर : पत्नी व तीन महिला नातेवाइकांच्या मदतीने मद्यतस्करीचा प्रयत्न करणारा नागपूरचा पोलिस कर्मचारी परवेज बाळापुरे (32, रा. धरमपेठ बुद्धविहाराजवळ) याला मूल येथून अटक केली आहे. त्याच्यासह शिवली परवेज बाळापुरे, सुनंदा रंगारी, अंकिता मोटघरे व पायल तायवाडे यांनासुद्धा जेरबंद केले आहे. सर्व नागपूरचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडून दारूच्या एक हजार 152 बाटल्या हस्तगत केल्या आहेत.
परवेज हा नागपूर पोलिस मुख्यालयात नियुक्त आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना तसेच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याची पुरेपूर कल्पना असूनसुद्धा परवेजने मद्यतस्करीचा प्रयत्न केला. दोन कारमध्ये मद्यसाठा भरून तो चंद्रपूर जिल्ह्यात जात होता. कुणालाही शंका येऊ नये यासाठी त्याने पत्नी व अन्य महिला नातेवाइकांना सोबत घेतले होते. मद्यतस्करीसंदर्भात मिळालेल्या गुप्त माहितीवरून चंद्रपूर पोलिसांनी पंचासह मूल येथील चामोर्शी नाका परिसरात सापळा रचला. दोन्ही वाहनांना थांबवून झाडाझडती घेतली असता तीन लाख 45 हजार 600 रुपये किमतीच्या एकूण 48 पेट्या भरून मद्यसाठा आढळला. आरोपींकडून मद्यसाठ्यासह एकूण 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.