दृष्टिहीन मुलांची डोळस कामगिरी

नीलेश डाखोरे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

नागपूर - ज्यांच्या हातापायात शक्ती आहे अशांनी काही वेगळे काम केले तरी त्याचे कौतुक वाटते. अंध, दिव्यांग, गतिमंद मुले तर देवाघरची संवेदनशील फुले असतात. त्यांच्या कामाचीही चर्चा व्हायला हवी. अशीच डोळस कामगिरी दशरथ जोगदंड व अमोल गोडघासे या दृष्टिहीन मुलांनी केली आहे. 

नागपूर - ज्यांच्या हातापायात शक्ती आहे अशांनी काही वेगळे काम केले तरी त्याचे कौतुक वाटते. अंध, दिव्यांग, गतिमंद मुले तर देवाघरची संवेदनशील फुले असतात. त्यांच्या कामाचीही चर्चा व्हायला हवी. अशीच डोळस कामगिरी दशरथ जोगदंड व अमोल गोडघासे या दृष्टिहीन मुलांनी केली आहे. 

वाशीम जिल्ह्यातील केकतउमरा गाव. येथील झुडपीजंगलात राहणाऱ्या १५ ते २० मुलांचा चेतन सेवांकुर नावाचा ऑर्केस्ट्रा. या दृष्टिहीनांनी ईश्‍वराने दिलेल्या तल्लख बुद्धीच्या जोरावर संगीत कला अवगत केली आहे. केवळ वाशीम जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र, गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, केरळ आदी राज्यांत शेतकरी आत्महत्या, व्यसनमुक्ती, नेत्रदान, सकारात्मक दृष्टिकोन, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी आदी विषयांवर ही मुले प्रबोधन करतात. पावसाळ्याच्या दिवसांत काम मिळत नाही. त्यामुळे उपजीविकेसाठी राख्या तयार करीत असतात. ही मुले-मुली तीन वर्षांपासून राख्या तयार करीत आहेत. जन्मत: नेत्रहीन असतानाही अप्रतिम राख्या बनवून डोळसांना लाजविणारी कामगिरी करीत आहेत. १८ वर्षीय जोगदंड हा जन्मत: दृष्टिहीन असून, बारावीत आहे. २० वर्षीय गोडघासे याला अपघाती अंधत्व आले. तो बी.ए. प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. यांच्यासह अन्य सहकाऱ्यांना राख्या तयार करण्याचे प्रशिक्षण पांडुरंग उचितकर यांनी दिले. नागपुरात राख्यांची विक्री करण्यासाठी हरीश खेडकर हा या दृष्टिहीन मुलांना मदत करतो. यंदा नागपुरात पाच ते सात हजारांच्या राख्या विकल्याचे दशरथ जोगदंड याने सांगितले. या मुलांनी जिद्द, चिकाटी, परिश्रम व जगण्याची उमेद या माध्यमाने दाखवून दिली आहे.

नियतीकडून अंधकारमय जीवन मिळाले. तरीही निराश न होता जगण्याची जिद्द आणि काही करीत राहण्याची धडपड कायम आहे. डोळे नसतानाही राख्या निर्मितीचे कठीणतम कार्य करून उपजीविका चालवायची आहे. राखी विक्रीतून येणाऱ्या पैशातून उदरनिर्वाहाला मदत मिळणार आहे. 
- दशरथ जोगदंड

Web Title: Blind Boys Rakhi Making Motivation