video : अंध 'ईश्‍वर' गातो आईचे गोडवे 

केतन पळसकर 
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

  • रस्त्यांवर गाणे म्हणत कमवितो चार पैसे 
  • लहानपणीच आले अंधळेपण 
  • ईश्‍वरला लहानपणापासूनच गाण्याची आवड 
  • स्वत:च शब्दांची रचना करून म्हणू लागला गाणे 

नागपूर : आई म्हणजे ममता, आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्‍वर होय. आई मायेचा सागर आहे. आई हा एक साधा सोपा शब्द पण किती माया दडली आहे या शब्दामागे. जगच समावलेले आहे आईमध्ये. एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते. जन्म देऊन जगात आणणारी आई एखाद्या देवाचे रूप आहे. मराठीतील प्रसिद्ध कवी यशवंत यानी आपल्या कवितेत "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी' ही ओळ लिहून "आई' या शब्दाची महानताच थोडक्‍यात सांगितली आहे. 

"आई' हा शब्द मानवी भावनांशी निगडित असून, त्यास माणसाच्या जिवनात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. स्त्रीने जन्म दिला नसतानाही ती सवतीच्या मुलाची किंवा दत्तक मुलाची आई बनते, हेही तितकेच खरं आहे. लहानपणापासून मोठ्या आवडीने खायला व प्यायला देणारी आई प्रत्यक्ष अन्नपर्णा आहे. मुलगा आजारी पडल्यावर डॉक्‍टर आणि नर्स दोघांची भूमिका ती पार पाडत असते. रात्रभर जागून ती मुलाची सेवा करते. आई नेहमी निस्वार्थपणे फक्‍त मुलाच्याच भल्याचा विचार करीत असते. खरंच आई म्हणजे उन्हाची सावली, आई म्हणजे सुखाचा सागर आहे. 

सध्या नागपूरच्या रस्त्यावर आपल्याला मायेच्या गोडव्यांनी भरलेले सुरेल असे गाणे ऐकू येत आहे. स्वर कानावर पडल्यानंतर कदाचीत एखाद्या चित्रपटातील सुप्रसिद्ध पार्श्‍वगायकाच्या आवाजातील ध्वनिमुद्रीत किंवा एफएमवरील गाणे आपण ऐकतो आहे, असा भास होऊ शकतो. मात्र, ते ध्वनिमुद्रीत केलेले गाणे नसून नागपूरचाच रहिवासी असणाऱ्या अंध मुलाच्या आवाजातील गाणे असल्यास नवल वाटल्याशियाय राहणार नाही. 

Image may contain: one or more people and closeup
ईश्‍वर सनेश्‍वर

रेल्वे स्टेशनवर गाणे म्हणून भीक मागणारी राणू मंडल नेटकरींना चांगलीच परिचयाची झाली आहे. गाणे म्हणत ती रातो रात सेलीब्रिटी झाली. दुसरीकडे नागपुरातील अंध, युवा गायक रस्त्यावर गाणे म्हणत चार पैसे कमवितो आहे. रामबाग परिसरात राहणाऱ्या या कलावंताचे नाव आहे ईश्‍वर सनेश्‍वर.

दुर्देवाने लहानपणीच त्याला अंधळेपण आले. अशातच वडिलांचे छत्रसुद्धा लवकरच हिरावले. त्यामुळे ईश्‍वरसह त्याच्या दोन भावांची जबाबदारी त्याच्या आईवर येऊन पडली. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे शिक्षण नव्या वर्गापर्यंतच होऊ शकले. ईश्‍वरला लहानपणापासूनच गाण्याची आवड आहे. स्वत:च शब्दांची रचना करून तो गाणे म्हणू लागला. 

ऑर्क्रेस्टामध्ये गातो गाणे

संसाराचा गाडा ओढणे दिवसेंदिवस आईला कठीण होऊ लागल्याने आईच्या तक्रारी वाढल्या. तसेच मुलांकडून आईच्या अपेक्षा वाढल्या. इतर मुलांप्रमाणे मुलाने काही काम करून पैसे कमवावे, अशी त्या माउलीची माफक अपेक्षा आहे. आईला घरामध्ये हातभार लावण्यासाठी ईश्‍वर ऑर्क्रेस्टामध्ये गाणे गाऊ लागला. शिक्षणाच्या कमतरतेमुळे आणि व्यावसायिक ज्ञान कमी असल्यामुळे त्याच्यातील कलेचे मोल पैस्यामध्ये ठरवू शकला नाही. या कार्यक्रमांमधून त्याला फक्त पन्नास ते साठ रुपये मानधन मिळते. त्यामुळे दुर्देवाने भीक मागत तो आज आपले पोट भरतो आहे. 

आपलेही व्हावे लग्न

ईश्‍वरच्या आईने मोठ्या भावासह वयाने लहान असणाऱ्या भावाचे लग्न लावून दिले. मात्र, आपण अंध असल्याने अद्याप लग्न होऊ शकले नाही. आपले लग्न व्हावे व सुखाने संसार व्हावा असे स्वप्न भोळ्या मनाने ईश्‍वर पाहतो आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blind ishwar Sing Mother song