दृष्टिहीन रेवानंद देतो डोळसांना गणित-विज्ञानाचे धडे

केवल जीवनतारे
सोमवार, 3 डिसेंबर 2018

नागपूर : शिक्षणशास्त्राचे अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना डोळ्यात भावी जीवनाची सुंदर स्वप्ने रंगवणाऱ्या रेवानंद मेश्राम यांच्या डोळ्यात अचानक अंधार दाटला. नजर कायमची गेली. वीस वर्षे सुंदर जग बघणाऱ्या डोळ्यात काळोख भरला गेला. जगण्याचं बळ संपलं. जगण्यापेक्षा मरण जवळ करावे असे एका क्षणी वाटून गेले. परंतु, आयुष्यातील प्रवासात टेलिफोन ऑपरेटरचा कोर्स करताना सादिक शेख नावाची अंध मैत्रीण मिळाली अन्‌ इथूनच जातपात धर्माच्या पलीकडे जाणाऱ्या या दोघांच्याही मैत्रीला सुरुवात झाली.

नागपूर : शिक्षणशास्त्राचे अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना डोळ्यात भावी जीवनाची सुंदर स्वप्ने रंगवणाऱ्या रेवानंद मेश्राम यांच्या डोळ्यात अचानक अंधार दाटला. नजर कायमची गेली. वीस वर्षे सुंदर जग बघणाऱ्या डोळ्यात काळोख भरला गेला. जगण्याचं बळ संपलं. जगण्यापेक्षा मरण जवळ करावे असे एका क्षणी वाटून गेले. परंतु, आयुष्यातील प्रवासात टेलिफोन ऑपरेटरचा कोर्स करताना सादिक शेख नावाची अंध मैत्रीण मिळाली अन्‌ इथूनच जातपात धर्माच्या पलीकडे जाणाऱ्या या दोघांच्याही मैत्रीला सुरुवात झाली.
पुढे हे दिव्यांग मित्र लग्नाच्या बेडीत बांधले गेले. या दोघांच्या लग्नाची खरी कहाणी मुंबईतून सुरू झाली. सध्या चंद्रपुरातील चिंचपल्ली गावात दोघांचाही गोड संसार सुरू आहे. तर रेवानंद डोळस विद्यार्थ्यांना गणित-विज्ञानाचे धडे देण्याचा शिक्षकधर्म निभावतो आहे.
रेवानंद मूळचा ब्रह्मपुरीतील वायगावचा. चौथीपर्यंत गावातच शिक्षण झाले. 12 वी ब्रह्मपुरीतून पास झाल्यानंतर चंद्रपुरात शिक्षण शास्त्रातील "डीएड'ला नंबर लागला. मात्र, डीएडला असतानाच रेवानंदाची नजर कायमची गेली. नशिबी नैराश्‍य आले. मात्र, "आनंदवना'त ब्रेल लिपीचे प्रशिक्षण मिळाल्यानंतर मुंबईच्या नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड संस्थेत "टेलिफोन ऑपरेटर' प्रशिक्षणासाठी नंबर लागला. रेवानंदचा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू झाला. टेलिफोन ऑपरेटरचे प्रशिक्षण घेत असतानाच सादिक शेख ही अंध मुलगी प्रशिक्षण घेत होती. दोघांचीही मैत्री झाली. तिने रेवानंदला मदत केली. रेवानंदने टाटा सामाजिक संस्थेतून सामाजिक शास्त्रात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आणि पुण्यात "साथी' प्रकल्पाअंतर्गत फिल्ड ऑफिसरच्या पदावर काम सुरू केले. दोघांचीही मैत्री कायम होती. दोघांच्याही मनात प्रेमाचा अंकुर फुलत होता. परंतु, रेवानंद बौद्ध आणि सादिक मुस्लिम असल्याने लग्न शक्‍यच नाही. म्हणून दोघांनीही एकमेकांसमोर प्रेमाच्या भावनांना आवर घातला. मात्र, निखळ मैत्री सुरू होती. मात्र, रेवानंद विदर्भातील च, ज आणि छ या शब्दांचे उच्चारण बरोबर नसल्यामुळे नोकरीतील सोबती त्याची टिंगल करीत होते. अनेकांना रेवानंद हेच नाव माहीत होते. त्यामुळे मेश्राम हे नाव घेण्याऐवजी "सादिक' मिश्रा म्हणत होती. मिश्रा असल्यानेच मराठीतील उच्चार बरोबर नसल्याचे सांगून वेळ मारून नेत होती. आणि रेवानंदला मानसिक बळ देत होती. रेवानंदला चंद्रपूर येथे कायमस्वरूपी शिक्षकाची नोकरी मिळाली आणि त्याने पुणे, मुंबई कायमची सोडून दिली. मात्र, सादिक शेखला विसरला नाही. चंद्रपूरला आल्यानंतर लग्नासंदर्भात सादिकला विचारले असता, तिनेही होकार दिला. परंतु, धर्माचे काय? हा सवाल पुढे आला. परंतु, मिश्रा म्हणूनच घरी परिचय झाल्यामुळे तो लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत कायम होता. सध्या सामान्य मुलांच्या शाळेत दिव्यांग रेवानंद गणित  विज्ञान शिकवणारा एकमेव शिक्षक राज्यात आहे, हे विशेष.
फरीद मामूंच्या मदतीने लग्न
फरीद मामू या देव माणसामुळे रेवानंद आणि सादिकचे लग्न झाले. लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत रेवानंदची मेश्रामऐवजी मिश्रा म्हणून सादिकच्या घरी ओळख होती. मात्र, फरीद मामूला सादिकने सर्व इतिहास सांगितला होता. लग्नाच्या आदल्या दिवशी सादिक शेखच्या आईवडिलांना फरीद मामूंनी समजावले. दोघांचेही आयुष्य कसे सुंदर असेल याची ग्वाही दिली. आज रेवानंद सादिकच्या 22 वर्षांच्या संसारवेलीवर दोन मुले आहेत समीर आणि साहिल. समीर डॉक्‍टर बनत आहे तर साहिल बारावीला आहे.

Web Title: blind rewanand story