आयब्लॉक सापडले, चोर फरारच 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

नागपूर - जरीपटक्‍यातील एका चौकातील आयब्लॉकची चोरी करणाऱ्यांविरुद्ध महापालिका अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार नोंदविली. मात्र, हा चोर पोलिसांना अद्याप गवसला नसला तरी यात एका स्थानिक नेत्याचा हात असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे पोलिस व महापालिकेतील अधिकाऱ्यांनी "जाऊ द्या ना साहेब' अशी भूमिका घेतल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे तक्रारकर्त्याने पोलिसांना आयब्लॉक घेऊन जाणाऱ्या वाहनाचा क्रमांकही उपलब्ध करून दिला. आयब्लॉक सापडले; परंतु पोलिसांना चोरापर्यंत पोहोचण्यात राजकीय दडपण आडवे आल्याचे सूत्रांनी नमूद केले. 

2009-2010 मध्ये शरद पवार चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात आले. येथे उच्च दर्जाचे आयब्लॉक लावण्यात आले होते. त्यावेळी या कामासाठी 2 लाख रुपये खर्च झाले. 8 डिसेंबर 2016 रोजी एका व्यक्तीने जेसीबीच्या सहाय्याने हे आय ब्लॉक काढून नेले. याप्रकरणी माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांनी महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासकडे तक्रार केली. केवळ तक्रारच केली नाही, तर चोरी होत असल्याचे छायाचित्र, जेसीबीचा व तसेच आयब्लॉक वाहून नेणाऱ्या ट्रकचा क्रमांक पुराव्यासाठी दिला. परंतु, मनपा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने मनपा प्रशासनाने कारवाईसाठी टाळाटाळ केली. शरद पवार चौकाच्या बाजूलाच नागपूर सुधार प्रन्यासचे काम सुरू असल्याने त्यांनी काढले असतील, असे सांगत वेळ मारून नेण्यात आली. मात्र, नासुप्रने आयब्लॉक काढले नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणात काही जणांनी रेटा लावल्याने मनपा मंगळवारी झोनचे कनिष्ठ अभियंता सुनील सरपाटे यांनी मागील महिन्यात 7 मार्चला पोलिसांत तक्रार दाखल करीत पोलिसांना वाहनांचा क्रमांक आदींसह पुरावे दिले. मात्र, दीड महिना लोटूनही पोलिसांना आरोपीचा शोध लागला नाही. विशेष म्हणजे आता स्थानिक नेत्याचा हात असल्याचे पुढे आल्याने पोलिसांनी फाईलबंद करण्याची तयारी केल्याचे चित्र आहे. 

किती आयब्लॉक मिळाले? 
आता महापालिका अधिकारी आयब्लॉक परत मिळाल्याचा कांगावा करीत आहेत. मात्र, किती आयब्लॉक मिळाले? ते कुणी चोरले? याबाबत कुणीही शब्द काढायला तयार नाही. आजच्या किमतीनुसार या आयब्लॉकची किंमत चार ते पाच लाख रुपये आहे. 
पोलिसांचा माहितीस नकार 

मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत यांनी आयब्लॉक मिळाले असून, चोराचा तपास पोलिस करीत असल्याचे सांगितले. जरीपटका वरिष्ठ पोलिस निरीक्षक बहादुरे यांना विचारले असता त्यांनी याप्रकरणी काहीही माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे यात निश्‍चितच काळेबेरे असल्याचे अधोरेखित होत आहे. 

न्यायालयाकडे प्रकरण जाणार 
या प्रकरणाची फाईल बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आता न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही, असे वेदप्रकाश आर्य यांनी सांगितले. त्यामुळे प्रकरण न्यायालयात जाण्याची शक्‍यता आहे. राजकीय दबावामुळे पोलिस कारवाईस टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

Web Title: block theft in nagpur