आता माफक दरात आजार, रक्त तपासणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

आता माफक दरात आजार, रक्त तपासणी
नागपूर : आरोग्य तपासणी करताना खासगी पॅथॉलॉजी लॅबकडून हजारो रुपये उकळले जातात. गरिबांना परवडत नसल्याने अनेकदा ते तपासणी करण्याकडे दुर्लक्ष करतात. वेळीच निदान न झाल्याने दुर्धर आजाराने ग्रस्त होतात. मात्र, महापालिकेने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने 15 ते 150 रुपयांमध्ये सदर येथील केंद्रीय पॅथॉलॉजीमध्ये रक्त, मल, मूत्र तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

सदर येथील मनपा रुग्णालयात उभारलेल्या अद्यावत केंद्रीय पॅथॉलॉजीचे सोमवारी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. मनपा पदाधिकारी, आरोग्य अधिकारी, टाटा ट्रस्टचे प्रतिनिधी उपस्थित होते. मनपा रुग्णालय व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांना गरज असल्यास प्रयोगशाळा तंत्रज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार रक्त किंवा लघवीचे नमुने घेतील. हे नमुने केंद्रीय प्रयोगशाळेत पोहोचविले जातील.
केंद्रीय प्रयोगशाळेत तज्ज्ञ व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत नमुन्यांची तपासणी करून रिपोर्टस संबंधित मनपा किंवा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात येईल. विशेष म्हणजे, या चाचण्यांसाठी अत्यल्प शुल्क आकारण्यात येणार आहे. मोठमोठ्या खासगी पॅथॉलॉजी प्रयोगशाळेत हजारो रुपये मोजून कराव्या लागणाऱ्या तपासण्या आता अद्ययावत तंत्रज्ञानासह अत्यल्प दरात नागपूरकरांना मिळणार आहेत.
महापौरांनी केली रक्त तपासणी
उद्‌घाटनानंतर महापौर नंदा जिचकार यांनी प्रयोगशाळेची माहिती जाणून घेतली व रक्त तपासणी केली. अद्यावत पॅथॉलॉजीमध्ये नागरिकांना एकाचवेळी विविध 49 तपासणी करता येणार आहेत. यासाठी आधी नोंदणी करावी लागणार आहे. विशेष म्हणजे, नोंदणीपासून ते प्रक्रियेबाबतची माहिती नागरिकांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळणार आहे.

महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांना आधुनिकतेची जोड देण्यासाठी टाटा ट्रस्टने मदतीचा हात दिला. टाटा ट्रस्टने केलेला कायापालट मनपाच्या आरोग्य सेवेबाबतचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलविणारा ठरणार आहे. मात्र, त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचा दर्जा टिकून राहील, यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनीही लक्ष द्यावे.
- नंदा जिचकार, महापौर.

Web Title: blood test in affordable price