बॉबी सरदार हत्याकांडाचा उलगडा

नागपूर ः पत्रकार परिषदेत माहिती देताना सहआयुक्‍त कदम, अतिरिक्‍त आयुक्‍त गायकर आणि गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस उपायुक्‍त नीलेश भरणे. समोर बसलेले आरोपी.
नागपूर ः पत्रकार परिषदेत माहिती देताना सहआयुक्‍त कदम, अतिरिक्‍त आयुक्‍त गायकर आणि गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस उपायुक्‍त नीलेश भरणे. समोर बसलेले आरोपी.

नागपूर : शहरातील बहुचर्चित बॉबी सरदार हत्याकांडाचा अखेर गुन्हे शाखेने उलगडा केला. कुख्यात लिटिल सरदार हत्याकांडाचा मास्टर माइंड निघाला. गुन्हे शाखेने लिटिलसह चौघांना अटक केली. आरोपींना आर्थिक पुरवठा करणारा मंजित वाडे फरार आहे.
शैलेंद्रसिंग ऊर्फ लिटिल सरदार गुरुचरणसिंग लोहिया (वय 43, रा. अशोकनगर), गुरमितसिंग ऊर्फ बाबू बचनसिंग खोकर (वय 56, रा. अशोक चौक), हरजितसिंग ऊर्फ सिट्टू गुरुबचनसिंग गौर (वय 28, रा. बिनाकी मंगळवारी) व मनिंदरसिंग ऊर्फ हनी हरजितसिंग चंडोक (वय 44, रा. दहा नंबर पुलिया) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी शनिवारी पोलिस जिमखाना येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये लिटिल सरदारवर पाचपावली भागात गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत लिटिल थोडक्‍यात बचावला होता. यानंतर वाहतूकदार मंजित वाडे याच्या पाचपावलीतील कार्यालयात सुरू असलेल्या रमी क्‍लबवर पोलिसांनी छापा टाकला. दोन्ही घटनांमध्ये बॉबी माकनचा हात असल्याचा दाट संशय लिटिल आणि वाडे याला होता. दोघांनी साथीदारांच्या मदतीने बॉबीच्या हत्येचा कट आखला. 25 एप्रिलला रात्री लिटिल, वाडे व त्याचे साथीदार माकन याच्या कार्यालयात गेले. वाद मिटवायचा असल्याचे सांगितले. त्यानंतर लिटिल, वाडे व त्याचे साथीदार इनोव्हा कारने तर माकन हे त्यांच्या कारने कपिलनगरात गेले. लिटिलने माकन यांना कार थांबवायला लावली. तेथे दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर बळजबरीने लिटिल व वाडे या दोघांनी माकन यांना कारमध्ये डांबले. त्यांना घेऊन ते कपिलनगरमधून पसार झाले. याचदरम्यान एकाने दोरीने गळा आवळून माकन यांची हत्या केली. त्यांचा मृतदेह कोंढाळी भागात फेकला. 28 एप्रिलला मृतदेह आढळला. अपहरण करून माकन यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी अपहरण व हत्येसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या घटनेने शहर पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली. पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे, सहायक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार, सहायक निरीक्षक ज्ञानेश्‍वर भेदोडकर, प्रमोद घोंगे, योगेश चौधरी यांनी कारवाई केली.  
हनीमुळे हत्याकांड उघडकीस
बॉबी सरदारच्या हत्याकांडानंतर हनी नागपुरातून बेपत्ता झाला होता. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय होता. पोलिसांनी आधी हनी याला मुंबईतून व त्यानंतर अन्य मारेकऱ्यांना अटक केली. मारेकऱ्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची 7 दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली. पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलिस आयुक्त बी. जी. गायकर, गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे, सहायक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार उपस्थित होते.  
अडीच कोटींचा व्यवहार?
ट्रान्सपोर्टर मंजित वाडे आणि बॉबी सरदार यांच्यात शीतयुद्ध सुरू होते. त्याचा फायदा लिटिल सरदारने घेतला. मंजितने लिटिलला सुपारी दिल्याची माहिती समोर येत आहे. बॉबीची जवळपास 40 एकर जमीन आहे. या जमिनीवर लिटिल आणि मंजितसह अनेक राजकीय नेत्यांचा डोळा असल्याचे समजते. त्यामुळे अडीच कोटींचा व्यवहार झाल्यानंतर बॉबीचा "गेम' झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय
बॉबी सरदारच्या हत्याकांडाच्या पहिल्या दिवसापासूनच लिटिल सरदार, मंजित वाडे, पवन मोरयानी याच्यासह आठ ते दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. मात्र, पाचव्या दिवशी पुन्हा पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. मुख्य आरोपी मंजित वाडे फरार असल्याचे सांगितले जाते, तर पवन मोरयानीचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे पोलिस ठासून सांगतात. यामुळे कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com