मेडिकलमध्ये शववाहिका असूनही ओढले जाते "स्ट्रेचर'वरून मृतदेह

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कधी काय घडेल, याचा नेम नसतो. अवाढव्य परिसर असलेल्या या रुग्णालयात कोणाचा पायपोस कोणाला नसतो. रुग्णांना दिलासा देण्याऐवजी त्यांना मनःस्ताप देणारे प्रकार नेहमीच घडतात, असे बोलले जाते. संवेदना बोथट झालेल्या मेडिकलमध्ये मृत्यूनंतरही "प्रेता'ची विटंबना होत असल्याचे चित्र दिसून येते. शववाहिका असतानाही रस्त्यावरील खड्डे तुडवित स्ट्रेचरवरून मृतदेह शवविच्छेदन विभागात पोहोचवण्यात येत असल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.

मेडिकलच्या क्षयरोग विभागासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली शववाहिका गेल्या सहा वर्षांपासून अडगळीत पडून आहे. डॉ. अपूर्व पावडे मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक असताना त्यांच्या काळात क्षयरोग विभागातील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या महिलेचा मृतदेह वॉर्डात तब्बल पाच तास पडून होता. तिचा मृतदेह मेडिकलच्या शवविच्छेदन विभागात हलविण्यासाठी शववाहिका उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. क्षयग्रस्त असल्याने मेडिकलमधील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्याकडे विनंती करूनही तिच्या मृतदेहालादेखील हात लावण्यास कोणीही तयार नव्हते. मृत्यूनंतरही मेडिकलमध्ये मृतदेहाचा अशाप्रकारे छळ होत असल्याचा प्रकार निदर्शनास आणून दिला होता. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. पावडे यांनी तडकाफडकी एका सामाजिक संघटनेची मदत घेऊन शववाहिका उपलब्ध करून दिली होती.

सायकल रिक्षाची बनवली शववाहिका
संबंधित सामाजिक संघटनेने सायकल रिक्षाला शववाहिनीत रूपांतरण करून दिले होते. सहा ते सात वर्षांपासून ही शववाहिनी केवळ एक ते दोन वेळा वापरात आणली गेली. ही शववाहिका अडगळीत धूळखात पडून आहे. ट्रॉमा किंवा मेडिकलच्या आपत्कालीन विभागात मृत्यू झाल्यास शवविच्छेदन विभागापर्यंत पोहोचविण्यासाठी खड्डेयुक्त रस्त्यावरून मृतदेह स्ट्रेचरवरून नेण्यात येतो. मृतदेह पोहोचवत असताना स्ट्रेचर हलताच मृतदेह हलतो, स्ट्रेचरवरून मृतदेह पडण्याची भीती असते, यासंदर्भात अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी शवपेटी तयार करण्यात येईल, असे सूतोवाच दिले होते. परंतु, अद्यापही "स्ट्रेचरयुक्त शवपेटी' तयार झाली नसल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com