बोगस आधार देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

बोगस आधार देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

नागपूर : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांनी अनोखा फंडा शोधून काढला आहे. कोणत्याही नावाने तिकीट घ्यायचे. गरजू प्रवाशांना चढ्या दरात त्याची विक्री करायची, सोबत नावाप्रमाणे बोगस आधारकार्ड तयार करून द्यायचे. या क्‍लृप्तीची कुणकूण आरपीएफला लागली. त्याआधारे रविवारी रात्री मुंबई दुरांतो आणि पुणे गरीबरथमध्ये छापा टाकण्यात आला. यात बोगस आधारकार्ड असलले तब्बल 105 प्रवासी अडकले. बनावट आयडीवर रेल्वेप्रवास करणाऱ्यांवर कारवाईची ही देशातील पहिलीच घटना आहे. 
प्रवासी हंगामात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे रॅकेट सक्रिय असून ते बोगस आयडीही बनवून देत असल्याची माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय यांना मिळाली होती. त्या आधारे मुंबई दुरांतो आणि पुणे गरीबरथमध्ये कारवाईचा निर्णय घेण्यात आला. मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनीही सहकार्य करीत वाणिज्य विभागाचे कर्मचारी उपलब्ध करून दिले. दोन्ही गाड्यांमध्ये क्‍यूआर कोड रिडरसहित वेगवेगळे पथक रवाना करण्यात आले. नागपूर स्थानक सुटताच तपासणी सुरू करण्यात आली. गरीबरथमध्ये बडनेरापर्यंत कारवाई सुरू राहिली. यात 44 प्रवासी अडकले त्यांच्याकडून 50 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर दुरांतोमध्ये भुसावळपर्यंत पथकाने तपासणी केली. या गाडीतील 61 जणांवर कारवाई करीत 66 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई आरपीएफ निरीक्षक जी. ए. गरकल, एस. बी. पगारे, उपनिरीक्षक मुगीसुद्दीन, उषा बिसेन यांच्या नेतृत्वात पूर्ण करण्यात आली. 
दलालांवर गुन्हे 
आधारकार्ड नागरिकत्वाचा पुरावा आहे. बोगस आधारकार्ड अनेक दृष्टीने फार धोक्‍याचे आहे. त्याच्या गैरउपयोगाची शक्‍यताही नाकारता येत नाही. आधारकार्डचा गैरवापर गुन्हा असल्याने ते उपलब्ध करून देणाऱ्या दलालांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत नागपूरच्या दहा दलालांची नावे पुढे आली असून लवकरच त्यांच्याविरुद्ध स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल होणार आहे. बनावट कार्ड तयार करणारे जॉब वर्क सेंटरही रडारवर आहेत. 
गरीबरथ, दुरांतोच का? 
नियमाप्रमाणे मुंबई दुरांतो आणि पुणे गरीबरथची तिकीट विक्री चार महिन्यांपूर्वी सुरू होताच तासाभरात बहुतेक तिकीट विकल्या गेल्याची बाब तपासात समोर आली. यामुळे कारवाईसाठी याच गाड्यांची निवड करण्यात आली. अन्य गाड्यांमध्येही असाच प्रकार सुरू आहे. 
दलालांकडून नवनवीन क्‍लृप्त्यांचा वापर 
पूर्वी दलाल आरक्षण केंद्रावरून तिकीट खरेदी करायचे, नंतर फेक आयडीद्वारे रेल्वेचे तत्काल ई-तिकीट काढून काळाबाजार करू लागले. त्यात जोखीम अधिक असल्याने दलालांनी बनावट आधारकार्डचा फंडा शोधून काढला. फोटो शॉपद्वारे फोटो व नाव बदलून बोगस आधारकार्ड तयार करण्यात येतात. 
आरपीएफचे आवाहन 
कोणत्याही शासकीय ओळखपत्राचा गैरवापर गुन्हा आहे. त्यात प्रवासीही दोषी ठरतात. यावेळी प्रवाशांना साक्षीदार करून घेण्यात आले आहे. पण, यापुढे बनावट ओळखपत्राचा वापर करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल. प्रवाशांनी स्वत:च काळजी घ्यावी, असे आवाहन पांडेय यांनी केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com