बोगस बियाणे विक्रेते पोलिसांच्या रडारवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

वणी (जि. यवतमाळ) : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या बियाण्यांची विक्री कृषी केंद्रातून सुरू आहे. शिरपूर पोलिसांनी बोगस बियाणे विक्री करणाऱ्या सात जणांना अटक केली होती. यातील दोघांच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली. मोठे रॅकेट गळाला लागण्याची शक्‍यता असून, पोलिस त्यांच्या मागावर असल्याची माहिती आहे.

वणी (जि. यवतमाळ) : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या बियाण्यांची विक्री कृषी केंद्रातून सुरू आहे. शिरपूर पोलिसांनी बोगस बियाणे विक्री करणाऱ्या सात जणांना अटक केली होती. यातील दोघांच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली. मोठे रॅकेट गळाला लागण्याची शक्‍यता असून, पोलिस त्यांच्या मागावर असल्याची माहिती आहे.
खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रात गर्दी होत आहे. गेल्या वर्षी कृषी विभागाच्या पथकाने वणी शहरातील दीपक टॉकीज परिसरात असलेल्या कृषी केंद्रातून बोगस बियाणे जप्त केले होते. झरी तालुक्‍यातही ज्या दोन शेतकऱ्यांनी बियाणे घेतले ते कोरपना तालुक्‍यातील हिरापूर येथील कृषी केंद्रातून खरेदी केले होते. कृषी विभाग व शिरपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून चोर बीटीची 15 पाकिटे जप्त केले. हिरापूर येथून कृषी केंद्रधारक बाला बलकी याला अटक केली असता, त्याने राजेश भोयर (रा. सोनूर्ली) नामक व्यक्तीने बियाणे दिल्याचे सांगितले. पोलिसांनी भोयर याला ताब्यात घेतले असता, या प्रकरणातील मास्टरमाइंड माथा येथील सतीश डाहुले, राजुरा येथील प्रवीण ढेंगळे असल्याचे तपासात आढळून आले. पोलिसांनी लगेच त्यांनाही अटक केली. बियाणे विक्रीत जळगाव व गुजरातमधील व्यापाऱ्यांची नावे पुढे आली आहेत. पोलिसांनी अटक झालेल्या सात आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाच जणांना जमीन मंजूर केला, तर डाहुले व ढेंगळे यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने तिघांना सोमवारी (ता. 24) न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यांच्या कोठडीत शुक्रवारपर्यंत (ता.28) वाढ करण्यात आली आहे. चोर बीटी बियाण्याचे मुख्य केंद्र गुजरात आहे. तेथील व्यापारी पोलिसांच्या हाती लागल्यास रॅकेटचा भंडाफोड होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. लवकरच शिरपूर पोलिस गुजरातला जाण्याच्या तयारीत आहेत.
बियाणे कंपनीच्या एजंटची मुख्य भूमिका
बियाणे कंपन्यांनी आपले बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी अनेक एजंट पगारावर नेमले आहेत. हे एजंट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून आपल्या उत्पादनाची माहिती देतात. मात्र, जादा पैसे कमावण्याच्या नादात काही एजंट बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याची चर्चा आहे. तीन वर्षांपूर्वी अशाच एका कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अटकेत असलेले राजेश भोयर व सतीश डाहुले हे एका बियाणे कंपनीचे कर्मचारी आहेत, हे विशेष.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bogas seed sellers are on the radar of the police