यवतमाळच्या "मेडिकल'मध्ये बोगस नोकर भरती

सूरज पाटील
रविवार, 4 ऑगस्ट 2019

यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काही तोतयांनी बोगस नोकर भरती राबविली. बेरोजगार तरुणांना बनावट स्वाक्षरी, शिक्के असलेले आदेश दिले. हा खळबळजनक प्रकार उघडकीस येताच अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे तक्रार केली.

यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काही तोतयांनी बोगस नोकर भरती राबविली. बेरोजगार तरुणांना बनावट स्वाक्षरी, शिक्के असलेले आदेश दिले. हा खळबळजनक प्रकार उघडकीस येताच अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे तक्रार केली.
गेल्या काही महिन्यांपासून शासनस्तरावर विविध जागांसाठी नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. हिच संधी साधून काही तोतयांनी बेरोजगार तरूणांना हेरले. त्यांच्याकडून ठरावीक रक्कम घेऊन नोकरीचे आमिष दाखविले. वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक, भांडारपाल, शिपाई, चालक अशी पदे भरण्यात येत असल्याचे दर्शवून बनावट निवड समिती तयार केली. सात बेरोजगार तरुणांना 23 फेब्रुवारी 2019 नियुक्ती आदेश दिले. पाच एप्रिल 2019 रोजी मूळ कागदपत्रांसह वैद्यकीय महाविद्यालयात हजर राहण्यास सांगितले. त्यावर अधिष्ठाता, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या आहेत. हे नियुक्ती पत्र घेऊन उमेदवारांनी महाविद्यालय गाठले. मात्र, त्यांना रूजू करून घेण्यात आले नाही. आज ना उद्या रूजू करून घेतल्या जाईल, अशी अपेक्षा तरुणांना होती. हा प्रकार सर्वप्रथम एका अभ्यागत मंडळ सदस्याच्या लक्षात आला. नियुक्तीपत्र देऊन रूजू करून घेण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे त्यांनी अधिष्ठातांना सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयात कोणत्याही प्रकारची नोकर भरती राबविण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बनावट नोकर भरतीमागे रॅकेटच सक्रिय असून, लाखोंची उलाढाल झाल्याची चर्चा आहे. फसवणूक होऊन एकही उमेदवार तक्रार देण्यासाठी पुढे आला नाही, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होताना दिसते. भरती प्रक्रिया राबविणाऱ्यांपैकी एकाला हिस्सा न मिळाल्याने हा प्रकार चव्हाट्यावर आल्याची शंका उपस्थित केली जात आहे. पोलिस दलाने तपास केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

वैद्यकीय महाविद्यालयातर्फे कोणतीही भरती घेण्यात आली नसून नियुक्ती पत्र देण्यात आले नाही. त्यावरील स्वाक्षऱ्या बनावट असून, संबंधितांची दिशाभूल करण्यात आल्याचे निदर्शनास येते. कागदपत्रे पडताळणीसाठी पाठविण्यात आली आहे. तशी तक्रार पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.
- डॉ. मनीष श्रीगिरीवार
अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bogus recruitment reported in yavatmal medical college