पावसाने मारले, कपाशीने झोडले, बियाण्यांत शेतकऱ्यांची फसगत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

शेतकऱ्यांनी लागवडीपासून तर पिकांच्या उत्पादनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत कपाशीचे संगोपन केले. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी निंदण, खुरपण, डवरण, फवारणी, खत आदींचा वापरही केला. मात्र, उत्पादन बाजारात नेण्याची स्थिती येऊनही शेतात दोन किंवा तीन बोंडे असलेल्या उभ्या प-हाट्या बघून घोर निराशा झाली.

सावनेर(जि. नागपूर) ः सलग चार-पाच वर्षांपासून कधी कोरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. त्याचा परिणाम एकंदरीत कृषी विकासावर आणि शेतकरी बांधवाच्या आर्थिक परिस्थितीवर झाला आहे. यंदाच्या खरीप हंगामातही परतीच्या पावसामुळे पिकांना फटके बसले. कपाशी उत्पादक व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे तर कंबरडेच मोडले. मात्र, यातच कंपनीच्या बियाण्यांमुळे कपाशी उत्पादनाचे तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्रकार उघड झाला. 
तालुक्‍यातील मंगसा, रामपुरी, भोजापूर, पोहणा, नांदुरी, उमरी आदी गावांमध्ये एका मार्केटिंग एजन्सीद्वारे इको वाणाच्या कपाशीच्या लागवडीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी लागवडीपासून तर पिकांच्या उत्पादनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत कपाशीचे संगोपन केले. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी निंदण, खुरपण, डवरण, फवारणी, खत आदींचा वापरही केला. मात्र, उत्पादन बाजारात नेण्याची स्थिती येऊनही शेतात दोन किंवा तीन बोंडे असलेल्या उभ्या प-हाट्या बघून घोर निराशा झाली. यावरून या कंपनीच्या बियाण्यांमुळे आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच अनेक शेतकऱ्यांची धावाधाव उडाली. शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभागाकडे धाव घेतली. शेतकऱ्यांची ही स्थिती बघून तत्काळ तालुका कृषी अधिकारी अनिल महंत यांनी कंपनीच्या विभागीय फिल्ड ऑफिसरशी संपर्क साधून बोलावून घेतले. 

चोवीस तासांत नुकसानभरपाई हवी! 
सहकाऱ्यांना सोबत घेऊन येथील शेत शिवारांतील पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांना धीर दिला. कंपनीने चोवीस तासांच्या आत शेतकऱ्यांची नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा प्राथमिक अहवाल वरिष्ठांना पाठवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्याची तालुका कृषी अधिकारी महंत यांनी ताकीद दिल्याचे समजते. तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, आमचा उद्देश शेतकऱ्यांचे हीत जोपासणे हाच आहे. अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहणी दौऱ्यावरून दिसून येत असल्याचे महंत सांगतात. याबाबत अहवाल आम्ही वरिष्ठांना पाठविणार असल्याचेही म्हणाले. 

अनुकरण केलेला प्रयोग फसला 
मागील वर्षी मंगसा गावातील काही शेतकऱ्यांनी याच वानाचे बियाणे लावले असता एकरी 15 क्विंटल कापूस झाल्याचा यशस्वी प्रयोग बघून गावात व परिसरातील शेतकऱ्यांनी या वानाच्या बियाण्याच्या लागवडीवर भर दिला आणि हा प्रयोग फसला. त्यामुळे 70 ते 80 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे मंगसा येथील शेतकरी शालिकराम रहाटे, भागवत ढोपरे, अमोरेश्वर चोरघडे, अदयाल भजन, सुभाष रहाटे, तिलक चोरघडे, हेमराज धंदे, भुनिराज राहटे, संपत महाजन आदींनी सांगितले. कपाशीच्या झाडाला जवळपास निदान शंभर-दीडशे बोंडे तरी लागायला पाहिजे होती. मात्र, कुठे चार-पाच तर कुठे आठ-दहा, अशी बोंडे आहेत. कपाशीवर चुड्डा गेलेला आहे. त्यामुळे आता अधिक बोंडे लागणार नाहीत. आता फक्त कापसाची झाडेच शिल्लक आहेत. अशी पिकांची स्थिती झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bogus seeds sold to farmers