बनावट सॉफ्टवेअरची राज्यभरात ‘धूम’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या तिघांनी कंपनीचे हुबेहूब सॉफ्टवेअर बनवून राज्यभर विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. आरोपींनी नागपूरसह राज्यातील अनेक संस्था, कंपनी आणि प्रतिष्ठानांना बनावट सॉफ्टवेअरची विक्री करून मालकाची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

नागपूर - सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या तिघांनी कंपनीचे हुबेहूब सॉफ्टवेअर बनवून राज्यभर विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. आरोपींनी नागपूरसह राज्यातील अनेक संस्था, कंपनी आणि प्रतिष्ठानांना बनावट सॉफ्टवेअरची विक्री करून मालकाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. गुरुवारी कोतवाली पोलिसांनी दोन ठिकाणी छापे घालून दोन संस्थांना विक्री केलेले सॉफ्टवेअर जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पंकज अविनाश वैद्य (पिपळा) या युवा अभियंत्याने बेरोजगार मित्रांच्या मदतीने आदमशहा ले-आउट परिसरात कॉड्रन्ट्र स्वॉफ्टटेक प्रा. लि. नावाने कंपनी सुरू केली. या कंपनीने अनेक बेरोजगार युवकांना रोजगार दिला. कंपनीत २०१६ ते १८ दरम्यान आरोपी टिकाराम ऊर्फ संतोष शंकरराव बिसेन (वय ३६, प्रेमनगर), मनीष रामदास वारकट (वय २८, रा. हरिहरनगर) आणि धर्मराज भाऊराव पिवळे (वय ३५, रामपूर, ता. मोहाडी, जि.  गोंदिया)  हे काम करीत होते. पंकज यांच्याकडून तिघांनीही कंपनीतील सॉफ्टवेअरबाबत तांत्रिक माहिती शिकून घेतली. त्यानंतर तिघांनीही कंपनीच्या सॉफ्टवेअरचा डाटा चोरला आणि त्यात काही प्रमाणात बदल करून प्रो पिग्मी नावाने कंपनी सुरू केली. पंकज यांच्या कंपनीच्या  सॉफ्टवेअरचाच वापर करून त्यांनी स्वतःचे सॉफ्टवेअर असल्याचे भासवून राज्यभरात विक्री केली.

तिन्ही आरोपींनी कंपनीचे लाखो रुपयांनी नुकसान करून बदनामी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आरोपींविरुद्ध कोतवाली ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी गोंदिया मोरगाव अर्जुनी येथील दोन संस्थांवर कोतवाली पोलिसांनी छापे घालून बनावट सॉफ्टवेअर जप्त केले.

Web Title: Bogus Software Crime